Neelam Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation Movement : देवेंद्र फडणवीसांना जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय; नीलम गोऱ्हेंकडून पाठराखण

भारत नागणे

Pandharpur News : मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यात चांगलेच पेटले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची आरक्षणाच्या प्रश्नावरून राळ उठवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून काही लोकांकडून जाणूनबुजून खलनायक ठरवलं जातंय, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज पंढरपुरात व्यक्त केली. (Maratha reservation : Devendra Fadnavis is being made a villain on purpose: Neelam Gore )

विठ्ठलाच्या दर्शनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे आज (ता. ८ सप्टेंबर) पंढरपूरमध्ये आल्या होत्या. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही भूमिका पूर्वीपासूनच मांडत आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. मराठा समाजाला त्यांनीच पहिल्यांदा आरक्षण दिले. पण, विरोधी पक्षातील लोकांना ते न्यायालयात टिकवता आलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिले, त्यावेळी ते नायक होते. पण, आज परिस्थिती बदलल्यामुळे फडणवीसांना खलनायक ठरवलं जातं. दोन दोन भूमिका एकाच व्यक्तीला करता येत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोष देणं चुकीचं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाच्या पन्नास टक्क्यांच्या चौकटीत राहून तोडगा काढावा लागणार आहे. मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्टया आरक्षण महत्वाचे आहे. ते देताना इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. राज्य सरकार हे जरांगे पाटील यांचे उपोषण सुटावे, यासाठी प्रयत्न करत आहे. आता देण्यात येणारे मराठा आरक्षण हे न्यायालयात टिकायला हवे. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. दोन दिवसांत आरक्षण देऊ असे यापूर्वी सत्तेत असणारे लोक म्हणत आहेत. पण, दोनशे दिवस सत्तेत होता, तेव्हा आरक्षण का दिलं नाही, उपरोधिक टोला नीलम गोऱ्हे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

विठ्ठल मंदिर विकास आराखड्यासाठी ३२ कोटी मंजूर

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकासासाठी राज्य सरकारने ७३ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी ३२ कोटी रुपयांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. कामाची टेंडर प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच मंदिर विकास आराखड्याचे काम सुरु होईल, अशी माहितीही गोऱ्हे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT