Maratha Protestors Crime Record : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Protestors Crime Record : मोठी बातमी : मराठा आंदोलकांच्या गुन्हेगारी रेकाॅर्डचे संकलन सुरू ?

सरकारनामा ब्यूरो

Nagar Political News : मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत. या आंदोलनाची तीव्रता नगरमध्येही कायम आहे. पण आता या आंदोलनाची झळ बसलेय, ती राज्य सरकारला. त्यामधील मंत्री, मराठा आमदार आणि नेत्यांना ! यामुळे मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांची माहिती घेतली जात आहे. त्यांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासली जात आहे. मला लवकरच तडीपारीची नोटीस येईल, अशी प्रतिक्रिया एका मराठा आंदोलकाने 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सर्वात पहिली झळ बसलीय, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याला. नरेंद्र मोदी गुरुवारी (ता. 26) शिर्डीत होते. यानिमित्ताने सभा आयोजित केली होती. या सभेला उच्चांकी गर्दीचे नियोजन होते. परंतु याच दरम्यान मराठा आंदोलनाची तीव्रता वाढली. नगर दक्षिणमधून जाणाऱ्या बस गाड्या मराठा आंदोलकांनी रोखल्या होत्या. काही बस गाड्या रिकाम्याच उभ्या राहिल्या. याशिवाय शिक्षक महासभेचे अधिवेशन काल नगरमध्ये झाले. तिथेदेखील मराठा आंदोलक घुसले. यामुळे मंत्र्यांचा दौरा रद्द झाला. तसेच संगमनेरमध्ये आंदोलकांनी मंत्र्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली.

तसेच नगर जिल्ह्यातील काही गावांमध्ये नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. तसेच जाहीर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा नगर जिल्ह्यात काढण्यात आली. राहता तालुका, शहर आणि शिर्डीत आज बंद पुकारण्यात आला आहे. शेवगावमध्ये टायर जाळून निषेध करण्यात आला आहे. या आंदोलनाची आता तीव्रता वाढू लागली आहे. मंत्री, आमदार, खासदार आणि नेते मराठा आंदोलक सर्वाधिक टार्गेट झाले आहेत. मराठा आंदोलकांनादेखील प्रत्युत्तर देण्याची तयारी केली जात आहे.

मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांची माहिती आता घेतली जात आहे. आंदोलकांचे गुन्हेगारी रेकाॅर्ड आहो का, याची माहिती मिळवली जात आहे. यासाठी नेत्यांचे विश्वासू कार्यकर्ते माहिती गोळा करण्यात गुंतले आहेत. या कार्यकर्त्यांनी प्रशासनाचीदेखील संपर्क साधत आहे. माहिती मिळवण्याची धडपड करत आहेत. मला लवकरच तडीपारीची नोटीस येण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया एका आंदोलकांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली आहे. काय व्हायचे ते होऊ देत, पण आता माघार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत आंदोलनात सहभागी राहणार असल्याचे निर्धार आंदोलक बोलून दाखवला. दरम्यान, मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या गुन्हेगारीचे रेकाॅर्डची माहिती गोळा करण्यासंदर्भातील माहितीबाबत प्रशासनाने मात्र मौन बाळगले आहे.

वैद्यकीय उपचार नाकारणार

नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मराठा आंदोलकांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने याची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही भेटी दिल्या आहेत. प्रशासनाने वैद्यकीय उपचार देणारी यंत्रणा सज्ज ठेवली जात आहे. तसे स्थानिक आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य यंत्रणा यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्यापद्धतीने वैद्यकीय उपचार नाकारले आहेत, त्याचपद्धतीने आम्हीदेखील शासनाकडून कोणतेही वैद्यकीय उपचार घेणार नसल्याची भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT