Dhairyasheel Mane News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mane News : 'आमचा खासदार हरवला आहे..' ; फलक झळकल्यानंतर धैर्यशील माने आले समोर!

Kolhapur Hatkanangle News : "आजारी असताना, मला सलाईन लावले असताना..."

Rahul Gadkar

Kolhapur Hatkanangle News : कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये एक अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनाची हातकणंगले भागात जोरदार चर्चा आहे. खासदार हरवले आहेत, असे फलक धरून तरूणांनी आंदोलन केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील पेठवडगाव मध्ये कार्यकर्त्यांनी 'आमचा खासदार हरवला आहे,' असे फलक दाखवत रोष व्यक्त केला. यानंतर खासदार धैर्यशील माने यांना समोर यावे लागले, त्यांनी पत्रक काढून आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

"माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून, आक्षेपार्ह घोषणा- टिप्पणी केली आहे. वास्तविक सर्व मराठा समाजबांधव एकीकडे आरक्षणासाठी लढा देत आहेत, तर काहीजण स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. खासदार हरवले आहेत, अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. याविषयी पोलिसात तक्रारी देत आहेत. यामुळे मुख्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत," असे खासदार माने म्हणाले.

"मी समाजाचे हित पाहताना अशा प्रकारचे राजकीय षडयंत्र चालू देणार नाही. आरक्षणाच्या बाबतीत मी नेहमी समाज बांधवांसोबतच आहे व इथून पुढेही सदैव कटिबद्ध असणार आहे," अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे खासदार धैर्यशील माने यांनी दिली. पत्रकात म्हंटले आहे, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मी संसदेमध्ये प्रभावीपणे मागणी केली होती. कोल्हापूरमध्ये काढण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये होतो. मी आजारी असताना, मला सलाईन लावले असताना भर पावसात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांच्या बरोबर मोर्चामध्ये मी सहकुटुंब सामील झालो होतो," असे पत्रकात माने यांनी नमूद केले.

"दोनच दिवसांपूर्वी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्वरित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून श्री मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलन स्थगित करणेबाबत निवेदन ही दिले आहे. माझे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत," असे माने यांनी पत्रकात म्हंटले आहे.

"लोकप्रतिनिधी व एक मराठा बांधव म्हणून माझी कर्तव्य व भूमिका मी योग्य पद्धतीने पार पाडत आहे. सर्व राज्यात आंदोलन शांतपणे सुरु आहे. सर्व आमदार , खासदारांना गाव बंदी आहे. त्यामुळे सर्व दौरे रद्द करून आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका आमच्या पद्धतीने पार पाडत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत मराठा समाजासोबत असेल," असे पत्रकात म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT