Amol Shinde News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation News : या पठ्ठ्याला मानलं ! शिंदेंना काढलं अन् जरांगेंना आणलं

Amol Jaybhaye

Solapur News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून राज्यभरातील मराठा समाजाने त्याला पाठिंबा दिला आहे. बीड जिल्ह्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आरक्षणासाठी आमदार, खासदारांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. शिवसेना शिंदे गटातही अनेकांनी राजीनामे दिले आहेत. शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी तर आपले कार्यालयच या आंदोलनासाठी दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमोल शिंदे यांनी आपल्या कार्यालयावरील मुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेनेचा फलक उतरवून मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या जरांगे पाटलांचा फलक लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते यासंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्याच कार्यालयावर आता अमोल शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे बॅनर लावल्याने राज्यात त्याची मोठी चर्चा होत आहे.

शिवसेनेचे दोन गट पडले तेव्हा अमोल शिंदे यांनी सर्वात प्रथम शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी शिंदे गटाशी एकनिष्ठ राहून शिंदे गट वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तींयांमध्ये त्यांचा समावेश होतो.

तसेच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याही ते जवळचे आहेत. मराठा आरक्षणाविषयी वेळोवेळी होत असलेल्या आंदोलनात ते सक्रिय असतात. अमोल शिंदे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे (Congress) नगरसेवक होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे (Shivsena) महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषवले होते. ज्यावेळी शिवसेना दोन गटात विभागली. त्यावेळी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

कार्यालयावर जरांगे यांचे बॅनर लावल्यानंतर अमोल शिंदे म्हणाले, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून काम करतो.पण या पदाच्या आधी मी मराठा आहे.मी आज जरांगे पाटील यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे.पक्ष आहे,पण नंतर आहे.आधी माझी जात आहे. ज्या जातीत जन्मलो तो समाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तो पर्यंत या कार्यलयात राजकारण होणार नाही, समाजासाठी काम होईल, राजीनामा देणे माझ्यासाठी खुप छोटी गोष्टी आहे. लोक आरक्षणासाठी आत्महत्या करत आहेत. मनोज जरांगे अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले आणि त्यामध्ये समाज समाधानी असेल तर मी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असेन ते आमचे नेते आहेत. पण तोपर्यंत मी मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्यासोबत ठाम राहणार आहे, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT