Medha Kulkarni : भाजप नेते आणि सहकारी परिषदेचे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात पडू नये नाहीतर त्यांची व्यवस्था करू. मागे त्यांचा तिकीट कापलं होतं हे त्यांना माहिती आहे, अशा पद्धतीची धमकी कुलकर्णी यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. ही धमकी नेमकी कोणी दिली? आणि कुठून दिली याचा शोध पोलीस घेत आहेत.
तब्बल 127 कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी शेखर चरेगावकर अडचणीत आले आहेत. कराड येथील यशवंत नागरी सहकारी बँकेच्या 140 कोटींपैकी 127 कोटींचे कर्ज बनावट संस्थांच्या नावावर उचलल्याचा आरोप चरेगावकर यांच्यावर आहे. चरेगावकर हे बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या माध्यमातून हे कर्ज उचलण्यात आल्याचे सांगण्यात येते.
याच प्रकरणात मेधा कुलकर्णी ठेवीदारांच्या बाजूने आवाज उठवत आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य सहकार आयुक्तांकडेही पाठपुरावा केला होता. शिवाय या प्रकरणात चरेगावकरांसह बँकेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनाही भेटल्या होत्या. याशिवाय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन ठेवीदारांची बाजू मांडली होती.
यशवंत बँकेकडून जवळपास 120 हून अधिक जणांची 140 कोटी रुपयांची फसणूक केल्याचा आरोप ठेवीदारांचा आहे. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी मेधा कुलकर्णी या ठेवीदारांच्या बाजूने लढत आहेत. मात्र 120 ठेवीदारांची फसवणूक केल्यानंतर आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतरही यशवंत बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना कोण वाचवत आहे, असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.