Nagesh Fate
Nagesh Fate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग-व्यापार आघाडी दोन लाख तरुणांना पक्षाशी जोडणार

भारत नागणे

पंढरपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) उद्योग व व्यापार विभागाने कंबर कसली आहे. या विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाशी जोडण्यासाठी या विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून या विभागाच्या वतीने राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियाची सुरुवात आणि वेबसाईटचे उदघाटन येत्या रविवारी (ता. २७ मार्च) पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांच्या हस्ते होणार आहे. (Member Registration Campaign of NCP Industry and Trade Department from Sunday)

राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने स्थापन केलेल्या उद्योग व व्यापार विभागाची राज्याची जबाबदारी पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून फाटे यांनी या विभागाच्या माध्यमातून मेळावे, शिबिरांचे आयोजन करून अनेक तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा व्हावा, यासाठी या विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी नजरेत राष्ट्र, ह्‌द्‌यात महाराष्ट्र हे ब्रीद वाक्य समोर ठेवून पक्ष संघटन वाढीसाठी जोमाने प्रयत्न सुरु केले आहेत. मागील सहा महिन्यांपासून फाटे यांनी राज्यभरात अनेक दौरे काढले, मध्यंतरी जनसंवाद रथ यात्राही काढली होती. त्यानंतर आता राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि जिल्हा परिषद गट पातळीवर सक्षमपणे राबवले जाणार आहे. यातून किमान दोन लाख नवीन सदस्यांची नोंदणी केली जाणार असल्याचे या विभागाचे प्रदेशाध्यक्ष फाटे यांनी सांगितले.

पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पंढरपूर राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT