The Miraj Panchayat Samiti Chairperson and Deputy Chairperson election has been cancelled, with fresh polls ordered by the Pune Divisional Commissioner's office. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का; मिरज पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतींची निवड रद्द

Vishal Patil : मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया विभागीय आयुक्त कार्यालयाने रद्द केली असून फेरनिवडणुकीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला राजकीय धक्का बसला आहे.

शंकर भोसले

Congress News : मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला तब्बल ४ महिन्यांनंतर कायदेशीर धक्का बसला आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने शुक्रवारी (१७ जुलै) संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करत फेरनिवडणुकीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी हा निर्णय दिला आहे.

या निर्णयानंतर सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी सभापती आणि उपसभापतीपदाची फेरनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वातील काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना यांच्या महाआघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मिरज पंचायत समितीच्या २२ सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्या आघाडीकडे ११ सदस्य, तर भाजप-शिवसेना युतीकडेही ११ सदस्य होते. अशा परिस्थितीत सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्याने आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती, तर ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली होती.

मात्र, सभापती निवडीपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक गैरहजर ठेवण्यात आल्याचा आरोप भाजप आणि मित्रपक्षांनी केला होता. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला असून, त्यानंतर भाजपच्या सदस्या राणी भोरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते.

मार्च महिन्यात झालेल्या निवडीनंतर सुमारे चार महिन्यांनी या प्रकरणावर निर्णय देताना अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी राणी भोरे यांचा अर्ज ग्राह्य धरत सभापती निवड प्रक्रिया रद्द केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी नियमानुसार फेरनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, या निर्णयाविरोधात संबंधितांना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत राज्य शासनाकडे अपील करता येईल. या निर्णयामुळे मिरज पंचायत समितीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी फेरनिवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT