Jashraj Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jashraj Patil News: अपघातग्रस्त रिक्षा काढण्यासाठी आमदारपुत्र उतरले खड्ड्यात!

Mangesh Mahale

विशाल वामनराव पाटील

Karad Political News: राज्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी नागपूरला हिवाळी अधिवेशनात असल्याने मतदार संघ वारसदार, कुटुंबातील नातेवाईक सांभाळताना पहायला मिळत आहेत. साताऱ्यातील अनेक युवा नेतृत्व आपल्या कामांनी नेहमीच चर्चेत असतात.

आगामी काळात आपल्या वडिलांच्यानंतर मतदार संघाची आपल्यावरच जबाबदारी असणार त्यामुळे आतापासूनच जनसंपर्क जोडताना पहायला मिळतायतं. यासाठी आतापासून सह्याद्री साखर कारखान्याची जबाबदारी खांद्यावर पेलणारे युवा नेतृत्व जशराज पाटील यांची संवेदनशीलता रात्री उशिरा झालेल्या अपघातात दिसून आली. 

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ कराड, खटाव आणि सातारा या तीन तालुक्यात विस्तारलेला आहे. लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब पाटील सध्या नागपूरला अधिवेशनात आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेले आहेत. त्याच्या पाठिमागे मतदार संघातील कार्यकर्ते, मतदार यांच्या गाठीभेटी घेवून समस्या जाणण्यासाठी आमदार पाटील यांचे पुत्र जशराज पाटील रहितमतपूर (ता. कोरेगाव) येथे गेलेले होते.

तेथून घराकडे परतताना खराडे फाटा (ता. कराड) येथे रात्री उशिरा एक मालवाहतूक करणारी रिक्षा खड्ड्यात पलटी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होवून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या. या मार्गावरून प्रवास करताना आमदारपुत्र जशराज पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी क्षणांचाही विलंब न करता अपघातग्रस्त रिक्षा चालकाला मदत केली. 

खराडे फाटा येथे रिक्षा रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली होती, तात्काळ जशराज पाटील आणि त्याच्यासोबत असलेल्यांनी खड्ड्यात उतरत मालवाहतकू रिक्षा बाहेर काढली. त्यानंतर या मार्गावरील संपूर्ण वाहतूक सुरळीत होईपर्यंत स्वतः त्याठिकाणी ठाण मांडले होते.

जवळपास एक तासाहून अधिक काळानंतर संपूर्ण वाहतूक व्यवस्थित करून आणि रिक्षा चालकाला धीर देवून जशराज पाटील पुढे मार्गस्थ झाले. आमदार पुत्राच्या या संवेदनशीलतेची सध्या कराड उत्तर मतदार संघात चांगलीच चर्चा होवू लागली आहे. 

वडिल, मुलगा आणि आता नातू

गिनिज बुक रेकॉर्डमध्ये नोंद असलेले कराडचे सलग 42 वर्षे नगराध्यक्ष राहिलेले कै. पी. डी. पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचेही प्रतिनिधित्व केले. त्यानंतर पी. डी. पाटील यांचे चिरंजीव शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी सलग नेतृत्व केले.

यामध्ये एकदा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवत बाजी मारली. आता आगामी वारसदार म्हणून जशराज पाटील यांच्याकडे पाहिले जात असून सध्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांसह विविध संस्थाची जबाबदारी देण्यात आली आहे. पी. डी. पाटील यांच्यानंतर मुलगा आणि आता नातू अशी वारसा कराड उत्तरेत पहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT