Nangar: ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'रोहित पवार यांच्या अंगात रक्त नाही, तर जातीयवाद वाहतो. जातीयवादाला चेहरा असता, तर तो रोहित पवारांसारखा असता. हे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवून द्या,' अशी टोकाची टीका आमदार पडळकर यांनी केली. नगरमध्ये काल ओबीसींचा एल्गार मेळावा झाला. मंत्री छगन भुजबळ हे प्रमुख वक्ते होते. तत्पूर्वी आमदार गोपीचंद पडळकर यांचे देखील जोरदार भाषण झाले. आमदार पडळकर यांच्या हिट लिस्टवर आमदार रोहित पवार होते.
आमदार पडळकर म्हणाले, "रोहित पवार नावाचे व्यक्तिमत्त्व हे जातीयवादाचे प्रतिनिधीत्व करत आहे. हे जातीयवादाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षणाची पदयात्रा आझाद मैदानावर पोहोचण्या अगोदर रोहित पवार तिथे हजर होते. यावरून रोहित पवाराच्या अंगात रक्त वाहत नाही, तर जातीयवाद वाहतो. जातीयवादाला चेहरा असता, तर तो रोहित पवारासारखा दिसला असता". धनगर समाजाचे तरुण आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहेत. तिथे रोहित पवार गेले का, असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या जन्मस्थळी असलेल्या जिल्ह्यात ओबीसींची एल्गार होत आहे. ओबीसींचे अख्खे ताटच पळवून नेले जात आहे. सत्ताधारी माजले असतील, तर त्यांची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. हक्कदार असेल, तोच राजा होईल, ही पुण्यश्लोक अहिल्यादेवीची शिकवण आम्ही विसरलेलो नाही. राजपाट, सत्ता मागवून मिळत नसते. ती हिसकावून घ्यायची असते. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय संपला. त्यामुळे लढण्याशिवाय पर्याय आपल्यासमोर नाही, असे आमदार पडळकर यांनी म्हटले.
नरवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथीच्या दिवशी ओबीसींचा एल्गार मेळावा होत आहे. ओबीसींचे नेतृत्व छगन भुजबळ करीत आहे. त्यांच्यामागे अख्खा गावगाडा उभा राहिला पाहिजे, असा निश्चय करा. छगन भुजबळ एकटे उभे नाहीत, तर आम्ही सर्व ठामपणे त्यांच्या मागे उभे आहोत. मागासवर्गीयांना त्यांच्या हक्काच्या प्रतिनिधीत्वसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांना मतदारसंघ राखीवची मागणी केली होती. याविरोधात महात्मा गांधी उपोषण केले. यानंतर आंबेडकरांनी घटनेतून आरक्षण दिले. आता हे आरक्षण हिसकावून घेण्याचा डाव आहे. मंडल आयोगाला विरोध होत आहे. यातून संविधानाचा ढाचा जेबीसी लावून उद्ध्वस्त केला जातो आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी आल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले.
बोगस कागदपत्रांद्वारे कुणबी प्रमाणपत्र घेतली गेली. आता शपथपत्र घेऊन पु्न्हा प्रमाणपत्र काढण्याचा घाट घातला जात आहे. सहजातीय आणि सगेसोयरे या शब्दांचा वापर करून गोलमाल केली जात आहे. मसुद्यामध्ये आंतरजातीय उल्लेख नाही. सरकारने शपथपत्राद्वारे प्रमाणपत्र काढणार्याना अधिकृत केले जात आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा कुणबी होणार, असे सांगितले जात आहे. तसे जीआर काढले जात आहे. एकच जात असेल, तर दोन प्रमाणपत्र कसे?, याची स्पष्टता सरकारने दिलेली नाही. यातून सरकार एससी-एसटीच्या देखील आरक्षणाला धक्का लावत आहे. मागासवर्ग आयोगाच्या यादीमध्ये मराठा जातीचा उल्लेखच नाही. मराठा आणि कुणबी पूर्ण वेगवेगळे आहे. त्यामुळे सगेसोयरे हा मुद्दाच लागू होत नाही, असाही दावा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.