Man Assembly Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLA Jayakumar Gore:दुष्‍काळमुक्‍तीच्‍या लढाईत मला रोखण्‍याचा अजेंडा

MLA Jayakumar Gore: मुंबईतील (कळंबोली) माण- खटाववासीयांचा संवाद मेळावा

सरकारनामा ब्यूरो

MLA Jayakumar Gore: मी माझ्या मातीच्या आणि मायबाप जनतेच्या स्वाभिमानाची, दुष्काळमुक्तीची लढाई लढत असताना विरोधक मात्र मला रोखण्याचा एकमेव अजेंडा घेऊन जनतेचा विश्वासघात करत असल्याचे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले. मुंबई, ठाणे, रायगडस्थित माण-खटावकरांचा कळंबोली येथे संवाद मेळावा झाला. त्‍या वेळी ते बोलत होते. यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह माण, खटावकर उपस्थित होते.

आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘‘शरद पवार, रामराजे निंबाळकर यांना माझ्या मतदारसंघात पाणी आणता आले नाही. रात्रंदिवस परिश्रम करून मी उरमोडी, तारळी, जिहे- कठापूरचे पाणी आणल्याने तसेच टेंभू योजनेची कामे सुरू केल्याने बारामती, फलटणकरांचा अपमान झालाय. त्याचाच बदला घेण्यासाठी प्रभाकर घार्गेंना मोहरा करून सगळे सुपारीबहाद्दर माझ्या विरोधात एक झाले आहेत.’’

ज्या माण-खटावमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे तुळशी बारशीच्या लग्नालाही ऊस मिळत नव्हता, तेथे आता चार चार साखर कारखाने सुरू आहेत. हजारो हेक्टरवर बागायती शेती होऊ लागली आहे. दुष्काळमुक्तीच्या दिशेने जाणारा हा जलक्रांतीचा बदल मी विविध योजनांचे पाणी आणल्यामुळेच झाला आहे.

जगाशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही आता औद्योगिक क्रांतीचीही बीजे रोवली आहेत. दळणवळणाचे जाळे निर्माण केले आहे. टेंभू योजनेची कामे सुरू केली आहेत. प्रभाकर घार्गेंनी मतदारसंघात नेमके काय दिवे लावले आहेत? ते जाहीरपणे सांगावे, असे आव्हान श्री. गोरे यांनी दिले.

आमदार गोरे म्हणाले, ‘‘दुष्काळात पाण्याचे टॅंकर मागणारी माण- खटावची जनता आता ऊस तोडण्यासाठी टोळीची मागणी करू लागली आहे. हा बदल करण्यासाठी मला गेली १५ वर्षे अहोरात्र परिश्रम करावे लागले आहेत. हजारो कोटींचा निधी मिळवून पाणीयोजना पूर्ण कराव्या लागल्या आहेत. कोरोना काळात मी हजारो रुग्णांवर मदत करून त्यांचे जीव वाचवले आहेत.

सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आमदारकीपेक्षा समाजाचे हित ध्यानात घेऊन मी अनेक अधिवेशनांमध्ये मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी केली आहे. माण-खटावमध्ये कधीच दुजाभाव न करता मी काम करत आलो आहे.

विरोधकांकडे माझ्या विरोधात लढण्याचा एकही मुद्दा नाही. त्यांच्याकडे कोणताच अजेंडा नाही. माण-खटावची सुज्ञ मायबाप जनता आमचं ठरलंयवाल्या टोळधाडीला नक्कीच घरी बसवणार आहे.’’

जनतेप्रती बेगडी कळवळा

बारामतीतून चावी मिळाल्याने चार्ज झालेले बिनकामाचे लाचार आणि तळवेचाटू निवडणूक संपत आली, तरी व्यासपीठावर भांडत आहेत. माझ्याच कृपेने एकदा विधानपरिषदेचे आमदार झालेल्या आणि कोणत्याच पक्षात नसलेल्या घार्गेंसाठी आमचं ठरलंयवाले जनतेप्रती बेगडी कळवळा दाखवत आहेत. घार्गेंना जनतेसाठी काहीच करायचे नाही. त्यांना जावयासाठी भविष्यातील वहिवाट तयार करायची असल्याने ते निवडणूक लढवत आहेत, असा आरोपही आमदार गोरेंनी केला.

कळंबोलीत मुंबईकरांची गर्दी

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील माण- खटावकरांनी कळंबोलीच्या मेळाव्याला गर्दी केली होती. व्यासपीठावर श्री. गोरेंनी चौकार मारण्याची कृतीही केली. पाणी आल्याने दोन्ही तालुक्यांत जलक्रांती होत आहे, आता एमआयडीसी होणार असल्याने रोजगारही उपलब्ध होणार आहेत. देवस्थाने रस्त्याने जोडली गेली आहेत. माण- खटावमध्ये बागायती शेती होऊ लागली आहे. हे बदल श्री. गोरेंच्‍या परिश्रमाचेच फलित असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT