Sangli Political News : शिरोळ विधानसभा मतदारसंघ पाठोपाठ हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गडी हेरून ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला हादरा दिला. जनसुराज्य शक्तीचे उमेदवार अशोक माने विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार राजू बाबा आवळे यांच्यात लढत होत असताना राजू शेट्टी (Raju Shetti) यांंच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेना ठाकरे पक्षाचा माजी आमदार फोडून हातकणंगलेतून उमेदवारी दिली.
हातकणंगलेतील राजकारणाला कलाटणी देत सध्या या मतदारसंघात तिरंगी लढत सुरू आहे. जवळपास 16 उमेदवार रिंगणात असून खरी लढत या तिघांमध्येच होणार आहे. या मतदारसंघावर अनुसूचित जातीचे आरक्षण असल्याने या तीन उमेदवारांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे. मराठा लिंगायत आणि जैन अशा मतदारांवर निकालाचे गणित ठरणार आहे.
काँग्रेसचे (Congress) नेते आणि आमदार राजू आवळे यांनी गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि जनसंपर्काची शिदोरी घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विजयासाठी काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकजुटाने कामाला लागली आहे.
महायुतीतून जनसुराज्यचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने रिंगणात आहेत. शिंदे यांची शिवसेना, भाजप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती यांच्यावर माने यांची मदार आहे. 2019 च्या पराभवानंतरही माने यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील संपर्क सोडलेला नाही. प्रत्येक कार्यक्रम, सभा, समारंभातही त्यांनी हजेरी लावली आहे. या संपर्काच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी डावल्यानंतर माजी आमदार सुजित मिणचेकर यांना सरतेशेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हातात घेतला. त्यामुळे या मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची बनली आहे. एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भक्कम दिसत असलेली महाविकास आघाडी मिणचेकर यांच्या फुटीमुळे विखुरलेली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीचा फायदा काँग्रेसचे आमदार राजू बाबा आवळे यांना झाला होता. यंदा तीच परिस्थिती असल्याने विजयाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार हे पहावे लागणार आहे. उमेदवारांपेक्षा जिल्ह्यातील नेत्यांवरच यांच्या विजयाचे भवितव्य अवलंबून आहे. मतदार संघावर क्षण असल्याने ज्या ज्या समाजाचे नेते उमेदवारासाठी एक दिलाने झटतील त्याचाच विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय चौगुले, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, महादेवराव महाडिक, अमल महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, तसेच माजी खासदार राजू शेट्टी, या सर्वांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. राखीव मतदारसंघ असला तरीही बौद्ध, मातंग, चर्मकार, जैन, लिंगायत, मुस्लिम आणि मराठा अशा सर्वच समाजांची समीकरणे या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.