MLA Nilesh Lanke
MLA Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला केली सुरवात

Amit Awari

पारनेर ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर, पारनेर नगरपंचायतची निवडणूक तीन महिन्यांवर तर जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पाच महिन्यांवर आली आहे. या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष हे पक्ष बांधणीचे काम करत असताना पारनेर तालुक्यातील आमदार नीलेश लंके यांनी मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी पक्षाचा प्रचारही सुरू केल्याचे चित्र आहे. पक्षाचा उमेदवार ठरण्यापूर्वीच त्यांनी आज केलेले विधान हे पारनेर तालुक्यातील आगामी निवडणुकांसाठी महत्त्वाचे सुतोवाच ठरणारे आहे. MLA Nilesh Lanke started campaigning for Zilla Parishad, Panchayat Samiti elections

जामगाव ते सारोळा आडवाई रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 82 लाख 15 हजार रूपये), जामगाव माथा साठे वस्ती ते लोणीहवेली रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 86 लाख 66 हजार), धोत्रे नगर कल्याण महामार्ग ते धोत्रे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 36 लाख 28 हजार), भाळवणी राज्य मार्ग ते हनुमानवाडी रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 58 लाख 27 हजार), भाळवणे ते दैठणेगुंजाळ रस्ता सुधारणा करणे (50 लाख), कोल्हापूरी बंधारा, जामगाव हाडोळेवस्ती (37 लाख 65 हजार), कोल्हापूरी बंधारा जामगाव मेहेरवस्ती (48 लाख 69 हजार) या कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण आमदार लंके यांच्या हस्ते आज (रविवारी) करण्यात आले, त्यावेळी ते भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

आमदार नीलेश लंके म्हणाले, पुढील वर्ष निवडणुकांचे आहे. माझे हात बळकट करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मीच उमेदवार आहे असे समजून भरघोस मतदान करण्याचे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी केले.

आमदार लंके पुढे म्हणाले, आपल्या मतदासंघात फक्त आणि फक्त घडयाळाचा गजर होणार असल्याचा दावा करतानाच कुठल्याही परिस्थितीत सर्व सत्ता ताब्यात घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली.

लंके यांनी सांगितले, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने एक आदर्श अर्थमंत्री राज्याला लाभला आहे. आपल्या मतदारसंघाला झुकते माप देण्याची भुमिका नेहमीच पवार यांनी घेतली आहे. कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आहे, अशाही स्थितीमध्ये पवार यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला नाही. अर्थसंकल्पातही तालुक्यातील कामांसाठी भरभरून निधी दिला. पाण्याच्या अनेक योजना पुर्णत्वास नेण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आग्रही आहेत. आपल्या मतदासंघावर विशेष लक्ष असलेल्या या पक्षाची ताकद वाढविण्याची जबाबदारी आता आपली आहे.

विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला भरभरून मते दिली. आता आगामी निवणुकीतही मी उमेदवार आहे हे समजून जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती तसेच नगर पंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालास दोन वर्षे पूर्ण झाल्याबददल यावेळी आमदार लंके यांची लाडू तुला करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाराम रोहकले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सुरेश धुरपते, प्रशांत गायकवाड, सुनंदा धुरपते, अशोक सावंत, अ‍ॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, संभाजी रोहोकले, जितेश सरडे, किशोर यादव आदी उपस्थित होते. बाबाजी तरटे यांनी प्रास्तविक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT