Solapur, 30 November : माळशिरस मतदारसंघातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार राम सातपुते हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात काम केले आहे, त्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सातपुते यांच्यापाठोपाठ आमदार श्रीकांत भारतीय यांनीही मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीसंदर्भात भाष्य केले. एकीकडे भाजपचे नेते आक्रमक झालेले असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा भाजपमध्ये फिल्डिंग लावून पक्षातील आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून राम सातपुते (Ram Satpute) यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली होती. जानकर यांच्या पाठीशी मोहिते पाटील यांची भरभक्कम पाठिंबा होता. त्यामुळे जानकर यांनी राम सातपुते यांचा 13 हजार 147 मतांनी पराभव केला. मोहिते पाटलांची मोठी ताकद विरोधात असूनही माळशिरसमध्ये सातपुते यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता.
पराभवानंतर राम सातपुते हे मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सातपुते यांनी लावून धरली आहे. सातपुते यांच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची शिफारस केली आहे.
देवेंद फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार श्रीकांत भारतीय यांनीही पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची शिफारस दोन्ही जिल्हाध्यक्षांनी केली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असे सांगितले होते, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विरोधात भाजपचे नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.
भाजपचे नेतेमंडळी विरोधात आक्रमक होत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे सावध खेळी करत आहेत. भाजपमधून हकालपट्टी मागणी होत असताना मोहिते पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळी विरोधात गेलेली असतानाही मोहिते पाटील यांनी आपले भाजपमधील स्थान पक्के करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातूनच त्यांनी बावनकुळेंची भेट घेतल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.