Solapur, 25 October : सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुती आतापर्यंत चारच जागांवर उमेदवार जाहीर करू शकली आहे. जिल्ह्यातील चार जागांवर अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीनेही उमेदवारी जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे या मतदारसंघांच्या उमेदवाराबाबतचा सस्पेनस वाढला आहे. विशेषतः माळशिसरमधील उमेदवार निश्चित असूनही त्यांची नावे आघाडी आणि युतीने जाहीर केलेली नाहीत, त्यामुळे माळशिरसच्या उमेदवारीचा सस्पेन्स वाढत चालला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सुरुवातीला भाजपने सर्वाधिक ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्या पहिल्या यादीत सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटचे उमेदवार, तर मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार यशवंत माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, करमाळा या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडून सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादीचे माजी महापौर महेश कोठे, करमाळ्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार नारायण पाटील, दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचे अमर पाटील, बार्शीतून माजी आमदार दिलीप सोपल, अक्कलकोटमधून काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे, सांगोल्यातून शिवसेनेचे दीपक साळुंखे हे उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत.
महायुतीने (Mahayuti) सोलापूर शहर उत्तरमधून भाजपचे माजी मंत्री विजयकुमार देशमुख, दक्षिण सोलापूरमधून भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी, मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने आदी उमेदवार जाहीर केले आहेत. या उर्वरीत सोलापूर शहर मध्य, माढा, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
विशेषतः माळशिरस मतदारसंघाचे महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निश्चित मानले जात आहेत. मात्र, दोन्हीकडून अद्याप उमेदवारीचे पत्ते खोलण्यात आलेले नाहीत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र, राष्ट्रवादीने अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही.
लोकसभा निवडणुकीच्या काळातच जानकर यांच्या उमेदवारीचे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलेले आहे. मोहिते पाटील यांचे संपूर्ण समर्थन जानकर यांना आहे, त्यामुळे त्यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर होईल, असे वाटत असतानाच पवारांच्या पक्षाकडून अजूनही त्यांना ‘वेटिंग’वर ठेवण्यात आलेले आहे.
दुसरीकडे महायुतीकडून विद्यमान आमदार राम सातपुते यांना पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, भाजपनेही माळशिरसचा उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही. सातपुते यांनी मात्र मतदारसंघ पिंजून काढला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सातपुते यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, सोलापुरातील पराभवानंतर सातपुते यांनी माळशिरसवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, त्यांंचीही उमेदवारी अद्याप जाहीर होऊ शकलेली नाही.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.