Rohit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar On Rajesh Patil: मेव्हण्याचं ऐकलं अन् कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं; रोहित पवारांचा आमदार राजेश पाटलांवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

Gadhinglaj Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या २५ ऑगस्टला कोल्हापुरातील दसरा चौक येथे जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रावादीत फूट पडल्यानंतर पवारांची कोल्हापुरात पहिलीच सभा होत असल्याने या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गडहिंग्लज विभागातील कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

या मेळाव्यात बोलताना आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता आमदार राजेश पाटील यांना जोरदार टोला लगावला. "पवार एके पवार म्हणणारे भीतीपोटी सत्तेत गेले. मेव्हण्यावर विश्वास ठेवला आणि आमदारांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावरच सोडले", असा निशाणा रोहित पवारांनी लगावला.

रोहित पवारांनी कुणाचेही नाव न घेता टीका केली असली तरी त्यांचा रोख कुणाकडे होता, हे कार्यकर्त्यांना कळले. त्यामुळे उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. कारण चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे मेहुणे हे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आहेत.

"जाती-धर्मात भेदभाव करण्याचे राजकारण भाजप करत आहे. कुटुंबाबरोबरच राष्ट्रवादी कुटुंब फोडले. राष्ट्रवादीही फोडली, याला भाजपच जबाबदार आहे", असा आरोपही रोहित पवारांनी केला.

"समाजात वाद निर्माण करणाऱ्या विचारांच्या विरोधात शरद पवार लढत आहेत. दिल्ली पुढे झुकायचे नाही हे धोरण शरद पवारांचे असून जनता त्यांच्या पाठीशी आहे", असेही रोहित पवार म्हणाले. यावेळी माजी सभापती अमर चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, सुनील गव्हाणे, विकास लवांडे, शशिकांत वर्पे आदी उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT