Sachin Kalyanshetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sachin Kalyanshetti : मुख्यमंत्री फडणवीसांनी विधीमंडळ समित्यांमध्ये सचिन कल्याणशेट्टींकडे दिली महत्वपूर्ण जबाबदारी!

Maharashtra Legislature Committee : सचिन कल्याणशेट्टी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार असून ते दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विधानसभेत पोचले आहेत. कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

Vijaykumar Dudhale

Solapur, 25 February : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची नियुक्ती भाजपने जाहीर केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील अकरा समित्यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जाहीर केले आहेत. रावसाहेब दानवे पाटील यांचे चिरंजीव संतोष दानवे पाटील यांच्याकडे सर्वाधिक महत्वाच्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे, तर आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे आमदार असून ते दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विधानसभेत पोचले आहेत. कल्याणशेट्टी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मंत्रिपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते. मात्र, सोलापुरातील इतर दोन वरिष्ठ आमदारही मंत्रिपदासाठी इच्छूक होते, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळू शकले नसल्याचे मानले जाते.

महायुतीच्या मागील सरकारमध्येही सचिन कल्याणशेट्टी यांचे नाव चर्चेत होते. राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री असताना त्यांनी कल्याणशेट्टी यांना सर्वाधिकार दिले होते. कल्याणशेट्टी यांना प्रति पालकमंत्री म्हणून सोलापूरमध्ये ओळखले जात होते. आजही त्यांच्या शब्दाला प्रशासनात मोठे वजन आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेल्या कल्याणशेट्टी यांचे भाजपमधील महत्व या निवडीने अधोरेखित झाले आहे.

आमदार कल्याणशेट्टी यांच्यावर फडणवीस यांनी अनेकदा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. तेलंगण आणि गोवा विधानसभा निवडणुकीतही फडणवीस यांनी कल्याशेट्टी यांच्यावर काही मतदारसंघाची प्रचाराची जबाबदारी दिली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती, त्यामुळे फडणवीस यांच्या निकषांवर ते खरे उतरले होते.

अक्कलकोटच्या आमदारकीबरोबरच सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. आत फडणवीस यांनी त्यांच्या आमदारांच्या निवासाची व्यवस्था असणाऱ्या समितीची धुरा सोपवली आहे. भाजपच्या इतरही सदस्यांवर वेगवेगळ्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे.

भाजपच्या वाट्याला आलेल्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे

पंचायत राज समिती : संतोष दानवे पाटील

सार्वजनिक उपक्रम समिती : राहुल कुल

विशेष हक्क समिती : राम कदम

मराठी भाषा समिती : अतुल भातखळकर

आमदार निवास व्यवस्था समिती : सचिन कल्याणशेट्टी

इतर मागासवर्गीय कल्याण समिती : किसन कथोरे

आश्वासन समिती : रवी राणा

महिला हक्क व कल्याण समिती : मोनिका राजळे

धर्मादाय खासगी रुग्णालय तपास समिती : नमिता मुंदडा

अनुसूचित जमाती कल्याण समिती : राजेश पाडवी

अनुसूचित जाती कल्याण समिती : नारायण कुचे

महायुतीमध्ये कोणाला किती समित्या?

महायुती सरकारमध्ये विधीमंडळ समित्यांचे वाटप झाले आहे. त्यात भाजपला 11, शिवसेनेला 6, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 5 समित्या मिळाल्या आहेत. या समित्यांवर हे तीनही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहेत. भाजपने आपल्या समित्यांची घोषणा केली आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या समित्यांच्या अध्यक्षांची अजूनही नियुक्त्या जाहीर केलेल्या नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT