Shahaji Patil
Shahaji Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिंदे साहेब मला मोठ्ठी जबाबदारी देतील : शहाजीबापूंनी काढली कार्यकर्त्यांची समजूत

दत्तात्रय खंडागळे

Shahaji Patil : सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांची वर्णी न लागल्यामुळे सांगोल्यातील बापू समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याला तब्बल 20 वर्षानंतरही मंत्रीपदाच्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी मी नाराज नसल्याचे आमदार शहाजी पाटील सांगत आहेत.

'काय झाडी, काय डोंगार...ओकेच' या डायलॉग बाजीमुळे प्रकाश झोतात आलेले शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी होती. तालुक्यातील त्यांचे अनेक समर्थक मंत्री पदाबाबत उघडपणे बोलून दाखवीत होते. तर अनेकांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत पैजाही लावल्या होत्या. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत शहाजी पाटील हे सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते.

शिवसेनेतील (Shivsena) सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून शिंदे यांचा हात धरला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून तालुक्यासाठी अनेक मोठी कामे करून घेतली होती. त्यामुळे त्यांचे शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे यावरून लक्षात येते. शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शहाजी पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल, असे सर्वत्र बोलले जात होते. मात्र, तसे झाले नाही.

याबाबत शहाजी पाटील हे नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र, नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. माझा मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्री म्हणून समावेश नसल्याने माझी शिंदे साहेब यांच्याबाबत कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी मला मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले आहे. मला त्यांनी कोणतीही जबाबदारी दिली तरी मी ती यशस्वीपणे पार पाडेन, असे शहाजी पाटील यांनी सांगितले.

सन 1999 ते 2002 मध्ये आघाडी सरकार असताना शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गणपतराव देशमुख हे पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री होते. त्यानंतर सांगोला तालुक्याला अद्याप मंत्रीपद मिळू शकले नाही. गेली 20 वर्षे झाले सांगोला तालुका हा जिल्ह्यात अनेक कारणांनी प्रकाशझोतात आहे. तरी मंत्रीपदापासून दूरच राहिला आहे. सध्या जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेले शहाजी पाटील यांना मंत्रीपदाची अशा निर्माण झाली होती. मात्र, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची वर्णी लागली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT