Solapur, 10 September : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात आपण निवडणुका लढलो. पण राजकीय मतभेद असूनही या दोघांनीही आपल्याला कधी त्रास दिला नाही. पण काही लोकांना उपकराची जाण नसते, त्यांना मदतीचा विसर पडतो, अशा शब्दांत माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर हल्ला चढवला.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील कार्यक्रमात माजी मंत्री देशमुख यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजीवर देशमुख यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे देशमुखांना पक्षात त्रास देणारे का, याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आयटी पार्कच्या मुद्यावरही सुभाष देशमुख यांनी भाष्य केले. होटगी येथेच आयटी पार्क होणार आहे. त्याबाबत मी भाष्य करणार नाही. पण आपल्यातीलच काही मंडळी दिशाभूल करतात, पण मी त्यावर बोलणार नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून सुभाष देशमुख आणि भारतीय जनता पक्षातील नव्याने मातब्बर म्हणवले जाणाऱ्या नेत्यामध्ये मोठ्या प्रमाणात शीतयुद्ध रंगले आहे. संबंधित नेत्याला एकेकाळी केलेल्या उपकराची जाणीव ही माजी मंत्री देशमुख यांनी पुन्हा एकदा करून दिली आहे, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, पालकमंत्र्यांसोबतही त्यांचे फारसे सख्य नाही.
या वेळी जिल्हा परिषदेचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड उपस्थित होते. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या वेळी उपस्थित होते. त्याचीही चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
दरम्यान, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे देशमुख यांचा रोख स्थानिक नेत्यांकडे होता की पक्षाच्या आमदाराकडे होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.