Pandharpur, 18 May : सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेगाने घडू लागल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख शिलेदार दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी करून लढविणार असल्याचे सांगितले. तसेच पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची इच्छाही व्यक्त केली आहे, तशी तयारीही दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आज (ता. १९ मे) पत्रकार परिषदेत पंढरपूर (Pandharpur) नगरपालिका निवडणुकी संदर्भात भाष्य केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविणार आहे. पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक मात्र सर्व पक्षातील लोकांना सोबत घेऊन लढविण्याचा आमचा विचार आहे. तसेच नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली तर निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे, असेही दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी स्पष्ट केले.
पंढरपूर नगरपालिकेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक आहे. नगरपालिकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ चालू आहे. पंढरपूर शहरात कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरु आहेत, त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे ती कामेही सुमार दर्जाची होत आहेत. त्या निकृष्ट कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही आपण नगरविकास खात्याकडे करणार आहे, असेही धोत्रे यांनी स्पष्ट केले.
पंढरीचा विकास साधण्यासाठी तसेच, नगरपालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पॅनेलच्या विरोधात सर्वपक्षीय पनेल तयार करण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्यासंदर्भात आमदार अभिजीत पाटील, राजू खरे यांच्याशीही चर्चा झाली आहे. लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असेही धोत्रे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.