मुंबई - कोरोना हे जागतिक संकट होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण केले गेले, कोरोनाच्या पहिल्या लाटेत काँग्रेसने हद्दच केली. महाराष्ट्र सरकारवरील कोरोनाचा (Corona) ताण कमी करण्यासाठी मुंबईमध्ये काँग्रेसने (Congress) मोफेत तिकीट वाटले. त्यामुळे इतर राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केला. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर त्यांच्या खास शैलीच टीका केली. ( Modi made a mistake about which level of politics he should go to )
बाळासाहेब थोरात म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. कोरोना काळात उत्तर भारतीय मजूर बांधवांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि काँग्रेसने केलेल्या मदतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, केंद्र सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी पातळी सोडून राजकारण करू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने कोणतीही तयारी न करता देशभर लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असलेल्या उत्तर प्रदेश आणि बिहारी बांधवांची स्थिती बिकट झाली, हातावर पोट असलेल्या सदर मजुरांना उपाशी मरण्याची वेळ आली. अशा वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी यांनी आम्हाला दिलेल्या सूचनेवरून आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मार्फत सदर मजुरांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. अनेक मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. जेव्हा हे मजूर बांधव घराच्या ओढीने आपल्या राज्यात परत जाऊ इच्छित होते, तेव्हा देशभर रेल्वे बंद होत्या.
मजूर पायपीट करत उत्तर प्रदेश आणि बिहार कडे निघाले होते. त्यात अनेकांचा मृत्यू झाला हे देशाने पाहिले. ही व्यथा बघून सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आम्हाला आवश्यक त्या सूचना केल्या आणि सदर मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही आमच्या उत्तर भारतीय बांधवाच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. व त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुमारे 50 हजार मजुरांना स्वखर्चाने सुखरूप आपापल्या गावी पोहोचविले, नंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने देखील दोनशे कोटी रुपयांची तरतूद करत सदर मजुरांची स्वतःच्या राज्यात जाण्याची सन्मानजनक व्यवस्था केली.
महाविकास आघाडी सरकारच्या या संपूर्ण कामाची जगभर वाहवा झाली. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेलेल्या मजुरांनी देखील महाराष्ट्र सरकारचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्याच उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या बांधवांवर आरोप करून मोदीजी काय सिद्ध करू इच्छित आहेत? काँग्रेसवर आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. राजकारण कोणत्या थराला जावून करावं याबाबत पंतप्रधान मोदी चुकले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
थोरात पुढे म्हणाले, खरे तर या काळात मजुरांच्या जाण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करणे अपेक्षित होते, मात्र केंद्र सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले आणि सदर मजुरांना मरण्यासाठी सोडून दिले. काँग्रेस पक्ष मानवतेच्या दृष्टिकोनातून पुढे आला. अनेक कार्यकर्त्यांनी पदरमोड करत सदर मजुरांना सन्मानजनक रित्या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाठविले. आम्हाला वाटत नाही, हा गुन्हा आहे. भारतातल्या सामान्य माणसांच्या पाठीशी काँग्रेस कायम उभी राहिली आहे आणि यापुढे उभी राहील, असे महसूल मंत्री म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.