Solapur, 01 November : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांच्या सभा मिळाव्यात, यासाठी उमेदवारांकडून फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हैदराबादच्या माधवी लता, तेलगंणाचे कट्टर हिंदुत्वादी आमदार टी राजा सिंह यांच्या सभा होणार आहेत.
भाजपपाठोपाठ महाविकास आघाडीकडूनही सर्वोच नेत्यांना सोलापूरच्या प्रचारसभेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास विकास आघाडीतील काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या सभा होणार आहेत. याशिवाय हिंदी आणि तेलुगू अभिनेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड यू. एन. बेरिया यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील बंडोबांना शांत करण्याचा प्रयत्न महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत. माघार चार नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. मात्र, सुट्यांमुळे चार नोव्हेंबर हा एकमेव दिवस हातात राहिला आहे, त्यामुळे सोमवारी माघारीसाठी तोबा गर्दी होणार आहे. पण, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांकडून नेत्यांच्या सभा मिळाव्यात, यासाठी आताच फिल्डिंग लावली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) करण्यात येत आहे. सोलापुरात सहा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर-मंगळवेढा आणि माळशिरस या मतदारसंघांचा समावेश आहे.
सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख निवडणूक लढवत आहेत, त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात सभा होणार आहे. पंढरपूर मंगळवेढा आणि माळशिरसच्या उमेदवारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचे नियोजन आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सोलापूरमधील भाजपचे स्थानिक नेते प्रयत्न करत आहेत.
नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जनसेना पक्षप्रमुख अभिनेते पवन कल्याण यांच्याही सभांचे नियोजन आहे, असेही भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार, राहुल गांधी, तेलगंणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या सभांना मागणी आहे. याशिवाय तेलुग भाषिकांची संख्या लक्षात घेऊन तेलुगू अभिनेत्यांच्या सभांचीही सोलापूरमधून मागणी होत आहे, त्यामुळे सोलापुरात विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात राजकीय नेत्यांसोबतच अभिनेतेही प्रचारासाठी उतरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.