jaykumar gore-dhairyasheel mohite patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gore On Mohite Patil : जयकुमार गोरेंचा हल्लाबोल : मोहिते पाटलांच्या भ्रमाचा भोपळा फुटला; जनतेने त्यांना अदृश्य केलंय

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली. अदृश्य शक्तीचा दावा करणाऱ्यांना जनतेनेच अदृश्य केल्याचा टोला त्यांनी लगावला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 June : विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून अनेकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. लोक आमच्यासोबत आहेत, अदृश्य शक्ती आमच्यासोबत आहे, असं ते आतापर्यंत असं गृहीत धरून चालत होते. मात्र, अशी लोकं आता अदृश्य झाली आहेत. सोलापूरच्या जनतेने त्यांना अदृश्य केले आहे, अशा शब्दांत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत हे ३६५ मतांनी विजयी झाले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळींनी विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांना जे पाळबळ दिलं, आशीर्वाद दिला आणि शेवटपर्यंत सोबत राहण्याची भूमिका घेतली. त्या सर्वांचे आभार मानतो.

अनेक लोकांच्या भ्रमाचा भोपळा या निकालाच्या निमित्ताने फुटला आहे. ते आतापर्यंत असं गृहीत धरून चालत होते की, लोकं आमच्या सोबत आहेत, अदृश्य शक्ती आमच्यासोबत आहे, अशी लोकं आता अदृश्य झाली आहेत. भविष्यात त्यांना त्यांचं अस्तित्व शोधावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा टोला गोरे यांनी मोहिते पाटील यांना लगावला.

ते म्हणाले, आता उशिरा का होईना त्यांना शंभू महादेवाची आठवण झाली, याचाही आनंद आहे. पण आता सोलापूरच्या जनतेने तुम्हाला अदृश्य केलेले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तुम्हाला अदृश्य केलेले आहे, त्यामुळे चमत्काराच्या भरोशावर असलेल्यांचा चष्मा आता गळून पडला आहे.

हर हर महादेवचा नारा देणाऱ्या अदृश्य शक्तीला आता शंभू महादेवानेच उत्तर दिले आहे. आता तरी त्यांनी भ्रमातून बाहेर पडावं आणि बंगल्यावरच राजकारण आता संपलं आहे, याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी मोहिते पाटील यांना लगावला.

ते म्हणाले, काही लोकांना स्वतःच्या ताकदीबद्दल इगो असतो, किंबहुना लोकांना गृहीत धरण्याची सवय असते. त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही. कारण सध्या जमाना गॉगलचा असून सामान्य माणसांचं काय चाललंय, याकडे बघण्याची त्यांची दृष्टी बाहेर गेलेली आहे. त्याला महत्व देणं मला योग्य वाटत नाही.

एक सांगतो, की असे अदृश्य शक्तीचे प्रयोग करणारे आता अदृश्य झाले आहेत. त्यांचं जिल्ह्यातील अस्तित्व संपलेले आहे. त्यांच्या कर्तृत्वातून त्यांना ही मतं पडलेली नाहीत. जी विचारधारा आहे, त्याच्या विरोधात पडलेली ही मतं आहेत. त्यामुळे या मतांचं कोणी श्रेय घेण्याचे कारण नाही. त्यामुळे अशा शक्ती जिल्ह्यातून अदृश्य झाल्या आहेत, त्यांना भविष्यात शोधावं लागेल, असेही गोरे यांनी म्हटले आहे.

जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार : जयकुमार गोरे

विकासाच्या मुद्यावर आम्ही सगळे सोबत राहणार आहोत. निवडणूक संपल्यानंतर जनतेच्या हिताचं काम करायचं असतं. त्यामुळे राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादीत असावं, अशी भूमिका आमचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करू. जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT