Dhairyasheel Mohite Patil-Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : चंद्रकांतदादांचं माझ्यावर विशेष प्रेम, निधीत झुकतं माप देतील; मोहिते पाटलांकडून पाटलांचे कौतुक

Solapur Politics : चंद्रकांत पाटील यांना मोहिते पाटील कुटुंबीयांबद्दल वेगळा आदर आहे, ते कुठे कमीपणा करतील, असं वाटत नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 June : राज्यात आपलं सरकार येईपर्यंत विकास कामांसाठी आम्हाला लय त्रास होणार आहे. त्रास म्हणजे वैयक्तिक त्रास नाही. पण विकास निधी कमी देतील, असं झालेल्या बैठकीतून वाटतंय. पण, चंद्रकांत पाटील हे आपले पालकमंत्री आहेत, ते चांगले आहेत. त्यांचे विशेष प्रेम माझ्यावर आहे. ते मला विकासनिधीत नक्कीच झुकतं माप देतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केले.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे गुरुवारपासून गावभेटीनिमित्त करमाळा (Karmala) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी करमाळ्यात बोलताना मोहिते पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे कौतुक केले. ते म्हणाले, करमाळ्यातून नारायण पाटील यांना निवडून आणायचं आहे. आपलं सरकार येईपर्यंत आपल्याला विकास कामांसाठी त्रास होईल.

चंद्रकांत पाटील हे आपले पालकमंत्री आहेत, ते चांगले आहेत. त्यांचे विशेष प्रेम माझ्यावर आहे. कारण, त्यांनी पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझी विशेष नियुक्ती केली होती. मोहिते पाटील कुटुंबीयांबद्दल त्यांना वेगळा आदर आहे, ते कुठे कमीपणा करतील असं वाटत नाही. विकासनिधीमध्ये मला ते नक्कीच झुकतं माफ देतील. नाही दिलं तर मी हट्ट करून चंद्रकांतदादांकडून काम करून घेईन, अशा शब्दांत मोहिते पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांचे कौतुक केले.

मोहिते पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांच्या आढाव्यासंदर्भातील बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांना निमंत्रण देण्यात आले होते. मीही त्या बैठकीला गेलो होतो. उजनी टुरिझमचा एक विषय चालला आहे. बॅकवॉटरला जी गावे आहेत, त्यातील सर्व नेतेमंडळींना मला सांगायचे आहे की, आता उजनी टुरिझमचा प्राथमिक आढावा दिलेला आहे. त्याचे डिटेलिंग होईल, बजेट मंजूर होईल.

उजनी टुरिझम हे पर्यटनाच्या दृष्टीकानातून विकसित केले जाणार आहे. त्याबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. कारण, पाणी प्रदूषण, पर्यावरण या सर्व गोष्टी आहेत. याशिवाय लोकांच्या काही मागण्या आहेत. सर्व प्रकल्प मंजूर झाल्यावर जागे होऊ नका. त्याबाबत आतापासूनच जागे राहून काम करा. त्याबाबत आपल्यालाही काही सूचना मांडायच्या आहेत अशी ताकद मोहिते पाटील यांनी उजनी काठच्या गावांतील पुढाऱ्यांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT