Sadashiv Lokhande
Sadashiv Lokhande Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खासदार लोखंडेंना दहा फोन केले तरीही ते गेलेच : संतप्त शिवसेना जिल्हा प्रमुखाने दिले हे आव्हान...

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला. त्यांनी राज्यात सत्तास्थापनेसाठी हलचाली सुरू केल्या त्यावेळी शिर्डीतील शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी शिंदे गटा विरोधात आंदोलन केले. आंदोलनाला आठवडाही होत नाही तोच लोखंडे हे शिंदे गटात गेले. लोखंडे हे भाजपमधून शिवसेनेत कसे आले. ते शिंदे गटात जाऊ लागल्यावर काय झाले होते याचा घटनाक्रमच शिवसेनेचे अहमदनगर उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवर यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितला. तसेच लोखंडे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे खुले आव्हानही खेवरे यांनी खासदार लोखंडे यांना दिले. Shivsena News Update

रावसाहेब खेवरे म्हणाले, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी खासदार लोखंडे यांना मी विनंती केली. माझे त्यांना एक-दोन नव्हेतर 10 फोन झाले. त्यांच्या स्वयंसहाय्यकालाही फोन केले. त्यांना म्हणालो शिवसेना सोडू नका. आज पक्षावर वाईट वेळ आहे. पक्ष प्रमुखावर वाईट वेळ आहे. अशा वेळी तुम्ही साथ द्यायला हवी. अशा वेळी तुम्ही पक्षा बरोबर रहायला हवे, शिवसैनिकाला ताकद द्यायला हवी. मात्र एवढी विनंती करून सुद्धा ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, असे खेवरेंनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, लोखंडे हे जे पहिल्यांदा 2014मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेद्वार म्हणून उभे राहिले. त्यावेळी ते शिवसेनेकडे उमेदवारी मागत होते मात्र बबनराव घोलप हे आमच्याकडे उमेदवार असल्याने आम्ही त्यांना उमेदवारी दिली नव्हती. मात्र बबनराव घोलपांना न्यायालयाच्या काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते उमेदवारी करू शकले नाहीत. तरीही आमच्याकडे चार उमेदवार होते. मात्र लोखंडे हे तीन वेळा आमदार राहिलेले होते. जनतेची नाळ असलेला व कार्यकर्ते संभाळणारा माणूस असल्याचे समजून पक्ष प्रमुखांनी उमेदवारी दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या वेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी गद्दारी केली. शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारले होते की, वाकचौरे लोक म्हणतात तुम्ही पक्ष सोडणार आहेत. त्यावर वाकचौरेंनी सांगितले होते की, मी साईबाबांची शपथ खातो. मी पक्ष सोडणार नाही. तरीही त्यांनी शिवसेना सोडण्याचे पाप केले. त्याचे भोग त्यांना भोगावे लागले, अशी आठवण त्यांनी सांगितली.

त्यावेळी मीही एक जिल्हा प्रमुख या नात्याने शपथ घेतली होती की, जो पर्यंत खासदार वाकचौरेंना पडत नाही. तोपर्यंत मी मातोश्रीची पायरी चढणार नाही. ज्या दिवशी वाकचौरेंना पाडलं, त्याच दिवशी मी मातोश्रीची पायरी चढलो. तोपर्यंत मी ही मातोश्रीवर गेलो नव्हतो. आज लोखंडेंबद्दल बोलायचे झाले तर लोखंडेंवर पक्ष प्रमुख, शिवसैनिक व मतदार संघातील जनतेचे एवढे मोठे उपकार आहेत की, त्यांनी कातड्याच्या चपला जरी करून मतदार संघातील माणसांना घातल्या तरी ते उपकार फिटणार नाहीत.

शिवसेनेने अचानक त्यांना उमेदवारी दिली. मतदानाला केवळ 17 दिवस बाकी होते. मतदारसंघातील 80 टक्के लोक त्यांना ओळखत नव्हते. तरीही लाखाच्या फरकाने त्यांनी वाकचौरेंना पराभूत केले. त्यांनी पाच वर्षे कोणतेही विशेष काम केले नाही. शिवसैनिकाच्या सुख-दुःखात गेले नाहीत. शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न केला नाही. ते नाकर्ते खासदार अशी इमेज जनतेत तयार झाली. तरीही दुसऱ्या निवडणुकीत संपूर्ण मतदार संघ म्हणत होता. उमेदवार बदला. पक्ष प्रमुखांना प्रत्येक व्यक्ती विनंती करत होता. मात्र उद्धव ठाकरे म्हणाले, लोखंडे हे माझ्या बरोबर प्रामाणिकपणे पाच वर्ष राहिलेले आहेत. एवढ्या वेळा तुम्हाला सहन करावे लागेल, असे म्हणत त्यांनी लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी दिली. शिवसैनिक व मतदार संघातील जनतेने जिवाचे रान करून पुन्हा त्यांना खासदार केले, असे त्यांनी स्पष्ट केले.

दोन वेळा हा माणूस शिवसेनेच्या जोरावर खासदार झाला. यांचे ना घर इथे आहे ना त्यांचे नातेवाईक इथे आहेत. त्यांचे कोणीही मतदारसंघात नाही. त्यांचे गाव कर्जत तालुक्यात ( जि. अहमदनगर ), ते रहायला मुंबईत. त्यांनी मनसेकडून कुर्ला विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. तेथे ही ते पराभूत झाले. भाजपतून ते मनसेत त्यानंतर ते शिवसेनेत आले. स्वतःचे मतदान नसताना, नातेवाईकांचे मतदान नसताना या माणसाला दोन वेळा शिवसेनेने खासदार केले. म्हणून मी लोखंडे यांना विनंती केली. तुम्ही बाकीच्या लोकांबरोबर जाऊ नका. बाकीच्या लोकांनी काय केलं, त्यांनी कसं फसविलं, या फंदात तुम्ही पडू नका. शिवसेना, शिवसेना पक्ष प्रमुखांचे व मतदार संघातील जनतेचे तुमच्यावर खुप मोठे उपकार आहेत. तुम्ही आज पक्षा बरोबर रहा, असे मी त्यांना सांगितले. मात्र त्यांनीच मला सांगितलं, मी पक्षा बरोबर राहिलो तर माझे पुढे काय होणार. ते दोनदा खासदार झाले. तीन वेळा आमदार राहिले तरी त्यांना पुढचाच प्रश्न, असा टोलाही त्यांनी लगावला.

खासदार होण्यासाठी काहींच्या चार-चार पिढ्या जातात. हा माणूस आला आणि शिवसेना प्रमुख, शिवसैनिक व मतदार संघातील जनतेच्या जिवावर खासदार झाला. मी त्यांना एकच सांगतो, तुमच्यात खरी हिंमत असली, तुम्ही कुठल्याही गटाबरोबर गेला असला, तुम्हाला परत यायचे नसेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या धनुष्यबाणाचा अपमान करू नका. तुम्ही राजीनामा द्या. निवडणुकीला सामोरे जा. तुम्ही खासदार म्हणून निवडून येऊन दाखवा. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही निवडून येऊन दाखवा मी शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा देईल, असे खुले आव्हानच त्यांनी लोखंडे यांना दिले.

या माणसाची कुवत, या माणसाची लायकी, सगळं मला माहिती आहे. हा किती कर्तृत्त्ववान माणूस आहे. हेही मला माहिती आहे. त्यांची भूमिका तशी राहिलीच. त्यांनी राजीनामा दिला नाही. शिवसेना व शिर्डी लोकसभा मतदार संघातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. ते परिणाम साधे सुधे नसतील. त्यांना वाटत असेल केंद्राची, महाराष्ट्राची सुरक्षा घेऊन येईल. किती दिवस सुरक्षा वापरणार आहेत. किती दिवस केंद्र सरकार सुरक्षा पुरवेल. एक दिवस उघड्यावर सापडतीलचं. शिवसैनिकांची तीव्र भावना आहे. शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खूपसून ते जात आहेत. लोखंडे हा निष्क्रिय खासदार आहे. खासदार लोखंडेच काय गेलेल्या 12 खासदारांपैकी एकही निवडून येणार नाही. लोखंडेंना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकले नाही. यापुढे मतदारसंघातील ते ज्या गावात शिरण्याचा प्रयत्न करतील त्यांना त्या गावात जाऊ देणार नाही. लोखंडे दिसेल तिथे शिवसैनिक जाब विचारणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT