Kolhapur Lok Sabha Constituency 2024  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: व्हायरल चर्चेने मंडलिक कार्यकर्ते आक्रमक; आज मेळाव्यात भूमिका मांडणार

Kolhapur Lok Sabha Constituency 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार संजय मंडलिक यांनी भेट घेतल्यानंतर उमेदवारीबाबत त्यांना तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur: आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) महायुतीतील उमेदवारीबाबत अजूनही संभ्रम आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandlik) यांना उमेदवारी मिळणार की, त्यांचा पत्ता कट होणार याबाबतच्या उलटसुलट चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.

भाजपचे नेते समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चाही मतदारसंघात सुरू आहेत. अद्याप उमेदवारीबाबत घोषणा होत नसल्याने आता खासदार मंडलिक कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंग येथे आज कार्यकर्ते स्वतंत्र मेळावा घेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांच्या भावना समजून त्यातून नेमका मार्ग काय निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, या मेळाव्याला खासदार संजय मंडलिक उपस्थित राहणार नाहीत, अशी ही माहिती आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीची अधिकृत उमेदवारी कोणाला, ही चर्चा संपवून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी विकासकामांसह संपर्क दौऱ्याला सुरुवात केली आहे. शहरातील मंडलिकप्रेमी कार्यकर्त्यांकडून आज दुपारी चार वाजता दैवज्ञ बोर्डिंगमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार संजय मंडलिक यांनी भेट घेतल्यानंतर उमेदवारीबाबत त्यांना तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, तरीदेखील उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. एकीकडे महायुतीचा उमेदवार या ठिकाणी ठरला असल्याचे सांगितले जात असताना राज्यात मंडलिक यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचे उमेदवार खासदार मंडलिक असणार आहेत. याबाबत कोणतीही संभ्रमावस्था नसल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केल्यामुळे कळत नकळत प्रचाराला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दौरे सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या तालुक्यांतील कार्यकर्ते, पदाधिकारी मंडलिकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या भागातील दौऱ्यांचे नियोजन करीत आहेत. शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडूनही मेळावा घेण्यात येणार आहे. लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक मंचने मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला कार्यकर्ते, मंडलिकप्रेमींनी उपस्थित राहण्याचेही आवाहनही संयोजक समितीचे प्रमुख संजयसिंह साळोखे, अजित माने, अशोक जाधव यांनी केले आहे. शहरातील हा पहिलाच मेळावा असणार आहे.

उमेदवारी कोणाला?

राज्यातील महायुतीची काही उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अद्याप शिंदे गटाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. मात्र, राज्यात तेरा जागा मिळतील, असा विश्‍वास शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर केव्हा होईल, याची वाट न पाहता संभाव्य उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शब्द घेऊन मतदारसंघात संपर्क, मेळावे, भेटी-गाठीला सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळेल, हा मुद्दा आता बाजूला पडल्याचे महायुतीत दिसून येते.

संभ्रमावस्था दूर करून थेट आपण रिंगणात उतरलो आहे, असा विश्‍वास घेऊन आता मंडलिकांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. उमेदवार म्हणून स्वतंत्र यंत्रणेतून प्रत्येक तालुकानिहाय आणि मतदारसंघनिहाय प्रचाराचे नियोजन सुरू झाले आहे. महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणा राबविली जाणार आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी जाहीर होऊ शकते. त्यामुळे वेळ न दवडता कामाला लागण्याच्या सूचना मंडलिकांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT