Lanke Vs Vikhe: विखे विरोधकांचे लंकेंना बळ मिळणार?

Nagar Lok Sabha 2024: नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजप खासदार सुजय विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यातील लढतदेखील निश्चित होताना दिसते.
Lanke Vs Vikhe
Lanke Vs VikheSarkarnama
Published on
Updated on

Nagar News: आमदार नीलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची औपचारिकता उरली आहे. नगर दक्षिण लोकसभेसाठी (Nagar Lok Sabha 2024) भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढतदेखील निश्चित होताना दिसते. या लढतीची गणिते आता मांडली जाऊ लागली आहेत.

भाजपमधील विखेंविरोधांची आमदार लंकेंना मोठी मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही मदत मिळवण्यासाठी आमदार लंकेंनादेखील तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पुढची राजकीय गणिते ओळखून विखे यंत्रणादेखील अलर्ट झाली आहे. त्यामुळे विखे-लंके यांच्यातील ही लढत राज्यात लक्षवेधी होणार हे निश्चित झाले आहे.

भाजपने दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० उमेदवार जाहीर केले आहेत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली. खासदार विखे यंत्रणा लगोलग कामाला लागली आहे. नगर दक्षिणमध्ये भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. संघटनेत जुन्यांविरोधात नवा, तर भाजप निष्ठावान विरुद्ध विखे यंत्रणा असा वाद सुरू आहे.

विखे यंत्रणा भाजप निष्ठावानांवर नेहमीच कुरघोडी करत असल्याने पक्ष संघटनेत धुसफूस आहे. या यंत्रणेमुळे विखे विरोधकांची संख्या जास्तच वाढलीय. असे असले, तरी विखे हे त्यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांवर नेहमीच मात करीत आले आहेत. ही त्यांची ताकद आणि ओळख आहे. या निवडणुकीतदेखील विखे यंत्रणाच विजयश्री खेचून आणेल, अशी अटकळ बांधली जातेय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुजय विखे यांनी २०१९ मध्ये भाजप आले. खासदार झाले. परंतु राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये दाखल झाले. २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली. या भाजपचे पाच विद्यमान आमदार पडले. या पराभवाचे खापर पराभूत उमेदवारांनी विखेंवर फोडले. तसे आरोप केले. आमदार प्रा. राम शिंदे यांनी याला जाहीरपणे तोंड फोडले. आमदार प्रा. राम शिंदे हे आजतागायत विखेंना वारंवार आव्हान देत राहिलेत. यातून त्यांनी लोकसभेच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे केली होती.

याशिवाय तिकिटाच्या रेसमध्ये संघ परिवार आणि भाजपचे निष्ठावान तसेच प्रदेश सदस्य प्रा. भानुदास बेरडदेखील होते. याशिवाय कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हेदेखील विखेंना जाहीरपणे टार्गेट करत अंगावर घेताना दिसतात. यातून आमदार शिंदे आणि विवेक कोल्हे यांची आमदार लंकेंशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. भाजप तिकिटाबाबत संदिग्धता असतानाच केंद्रीय समितीने खासदार सुजय विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.

Lanke Vs Vikhe
Sambhaji Raje News: लोकसभेच्या धामधुमीत संभाजीराजेंची वेगळीच चर्चा; लवकरच नव्या भूमिकेत

आमदार नीलेश लंके हे जुने शिवसैनिक आहेत. तत्कालीन आमदार विजय औटी यांच्याशी बिनसल्यानंतर लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. यानंतर लंकेंनी औटींविरोधात दंड थोपटले आणि विधानसभा २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. विद्यमान आमदारांना पराभूत करण्याचा त्यांचा पहिल्याच अनुभव असला, तरी ते दिग्गज विजय औटींविरोधात जुन्या खेळाडूसारखे लढले. हा विजय लंकेंची राजकीय वाटचाल अधिक भक्कम करून देणारा ठरला. पुढे लंकेंनी पवार कुटुंबीयांशी, अशी नाळ जोडली की, त्यातून त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याशी थेट संबंध निर्माण केले.

राजकीय उलथापालथ नंतर महाविकास आघाडी सरकार आले. या काळात त्यांनी अजितदादांकडून मतदारसंघात एक हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. कोविड सेंटरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आमदार लंकेंच्या साधेपणाची भुरळ खुद्द शरद पवार यांना पडली. शरद पवार यांनी आमदार लंकेंच्या घरी भेट दिली. याचवेळी आमदार लंकेंच्या लोकसभा निवडणुकीचे बीज रोवले गेले. परंतु पुढे राष्ट्रवादी फुटली. आमदार लंकेंचा यावर अजूनदेखील विश्वास नाही. आम्ही एकच आहोत, असेही काल शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलताना दिसले.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजितदादांबरोबर महायुती सरकारमध्ये सामील झाले. या वेळीदेखील मतदारसंघात साडेसहाशे कोटी रुपयांचा निधी आणला. एकीकडे पवार कुटुंबीयांशी जवळीक वाढत असतानाच नगर जिल्ह्यात विखेंविरोधात संघर्ष वाढत राहिला. मंत्री विखेंनी पारनेरमध्ये हस्तक्षेप सुरू केल्यानंतर आमदार लंकेंनी नगर दक्षिणमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. यातून या संघर्षाची धार वाढतच गेली. भाजपमधील विखेविरोधकांचे यातून लंकेंना बळ मिळत गेले. ते आजपर्यंत दिसते आहे.

आमदार लंकेंचे नगर दक्षिणेसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतरदेखील लंके हे शिवसैनिकांच्या संपर्कात आहेत. विखेंना नगर दक्षिणेत हेच शिवसैनिक डोकेदुखी ठरू शकतात. विखेंचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कधीच जमले नाही.

शिवसेना फुटीनंतरदेखील नगर दक्षिणेत शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्याबरोबर दिसत आहेत. यातच नगर शहरातील शिवसैनिकांची खासदार विखेंवर असलेली जाहीर नाराजी लपलेली नाही. असे असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची विखेंशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. आमदार जगतापांचे नगर शहरात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असलेले संघटन विखेंसाठी प्लस ठरू शकते.

राहुरी विधानसभा मतदारसंघात आमदार प्राजक्त तनपुरे यांचे आमदार लंकेंना बळ मिळू शकते, तर माजी आमदार कर्डिले यांचेदेखील नेटवर्क तेवढेच तगडे आहे. पाथर्डी-शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून खासदार विखेंनी अनेक विकासकामांचे उद्घाटन करून घेतले. परंतु काही ठिकाणी खासदार विखेंना रोषाला समोरे जावे लागले. यातच आमदार राजळेंना स्वकीयांसह विरोधकांनी घेरले आहे. पक्षांतर्गत तालुक्यात गटबाजी उफाळली आहे. याचा फटका खासदार विखेंनादेखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते हे वयोमानाने थकलेले आहेत. ते प्रत्यक्षात किती मैदानात येऊन मदत करतील, हे पुढे दिसेलच. माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्यात अजून ताकद ठेवून आहेत. राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या उपस्थित काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला आहे. पारनेर आमदार लंकेंचा बालेकिल्ला. खासदार विखेंसारखीच आमदार लंकेंची यंत्रणा मैदानावर फिल्डिंग लावून असते. पारनेरमध्ये लंकेंविरोधकदेखील कमी नाहीत. हे विरोधक साहजिक विखे यंत्रणेला मदत करणारच. यातून विखे-लंकेंचा संघर्ष पारनेरमध्ये सर्वाधिक पाहायला मिळेल.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com