RanveerSingh Gaikwad-Sanjay Mandlik
RanveerSingh Gaikwad-Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मंडलिकांचा तो दावा फेटाळत रणवीरसिंह गायकवाड म्हणाले, ‘मी तर राष्ट्रवादीचाच’

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेना ही स्वतंत्रपणे लढली होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत भाजप होता. या निवडणुकीत शिवसेनेने (shivsena) तीन जागा जिंकल्या, तर सत्ताधारी आघाडीने १८ जागा जिंकल्या. निकालानंतर शिवसेना पॅनेलचे प्रमुख खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी रणवीरसिंह गायकवाड यांना माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी निवडून आणले आहे, त्यामुळे ते आमच्यासोबत असल्याचा दावा केला होता. मात्र, गायकवाड यांनी मंडलिकांचा दावा फेटाळून लावत मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच (ncp) आहे. जिल्हा बँकेत मी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच राहणार आहे, असे स्पष्ट केले आहे. (MP Sanjay Mandlik's claim rejected by Ranveer Singh Gaikwad)

जिल्हा बॅंकेच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले होते की, मतदारांना जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध नको होती. हे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे. ही नुरा कुस्ती नव्हती आणि कोल्हापुरच्या जनतेला ती आवडतही नाही. मी कुस्ती मारणारा पहिलवान आहे. आम्ही तिघे शिवसेनेच्या पॅनेलमधून निवडून आला आहोत. तसेच, शिवसेनेचे इचलकरंजीचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे शिवसेनेचेच आहेत. शाहुवाडीतील रणवीरसिंह गायकवाड यांना माजी आमदार सत्यजीत पाटील यांनी निवडून आणले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे बॅंकेत सहा संचालक झाले आहेत, असा दावा खासदार मंडलिक यांनी केला हेाता.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रणविरसिंह गायकवाड हे शाहुवाडी तालुक्यातून सेवा संस्था गटातून अपक्ष निवडून आले. त्यांनी सत्तारूढ गटातील सर्जेराव पाटील (पेरीडकर) यांचा पराभव केला. आपल्या विजयाचे श्रेय्य त्यांनी शिवसेनेचे माजी आमदार सत्याजीत पाटील (सरुडकर) यांना दिले. त्यानंतर खासदार संजय मंडलिक यांनी सेनेच्या माजी आमदारामुळे गायकवाड विजयी झाल्याने ते आमच्याबरोबर येतील अशी शक्यता वर्तवली. त्यावर रणवीरसिंग यांनी पत्रक काढून स्पष्टीकरण दिले.

याबाबत बोलताना नवनिर्वाचित संचालक रणवीरसिंह गायकवाड म्हणाले की, माझे वडील उदय साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेससोबतच आहे. जिल्हा बँकेत मी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच राहणार आहे.

पत्रकातील माहितीनुसार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालीच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी काम करणार आहे. माझे वडील उदय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतच आहे. शाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड गटाची युती आहे. या युतीतर्फे आम्ही सर्व निवडणुकांना एकत्रित सामोरे जातो. जिल्हा बँकेच्या राजकारणात मी हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची बँक आहे. मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगला कारभार केला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बेरोजगार, कष्टकरी यांना कर्जरुपाने मदत केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठेवीदारांनी विश्वास दाखवल्याने सत्तारुढ आघाडीतील उमेदवारांचा विजय झाला. भविष्यातही जिल्हा बँकेच्या विस्तारासाठी प्रयत्न करू, असेही माने यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT