सोलापूर : वयोमानामुळे दौरे आणि पक्षकार्यात येणाऱ्या बंधनांचे कारण देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे (baliram sathe) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारणे असल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा दिल्यानंतर साठे यांनी काही सहकाऱ्यांसह मुंबई गाठली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्या भेटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना फोन करण्यात आला. पवार यांनीच काका साठे यांना पदावर राहण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Sharad Pawar instructs Baliram Sathe to remain as NCP district president)
साठे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी वाढत्या वयोमनामुळे शारीरिक हालचालीवर येणाऱ्या बंधनांचे कारण दिले आहे. मात्र, जिल्हाध्यक्षपदी काम करताना पक्षांतर्गत अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील काही पदाधिकारी हे थेट बारामतीला जाऊन साठे यांच्या विरोधात तक्रारी करत असल्याचे त्यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्याला वैतागूनच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सोलापुरात रंगली आहे.
राजीनामा दिल्यानंतर साठे हे काही सहकाऱ्यांसह मुंबईला गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. तेथूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन करण्यात आला. पवारांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदी साठे यांनाच तूर्तास कायम राहण्याची सूचना केली आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, काका साठे यांच्या राजीनाम्यानंतर जिलाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे सोपावयची, याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये माजी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे आणि कार्याध्यक्ष उमेश पाटील यांची नावे पुढे येत आहे. मात्र, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी उमेश पाटील यांचे असणारे सख्य पाहता पाटील यांच्या नावाला मोहोळमधूनच विरोध होऊ शकतो. दुसरीकडे, साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला होता. तसेच विधानसभेला सांगोल्यात शेकापशी राष्ट्रवादीची युती होती, त्यावेळी साळुंखे यांनी शिवसेना उमेदवार शहाजी पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद लावली होती. ती गोष्ट राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींच्या मनात अजूनही आहे. त्यांना जिल्हाध्यक्षपद दिल्यास पक्षाच्या कठीण काळातही पक्षाशी एकनिष्ठा राहणाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे, त्याचाही विचार पक्षाकडून होण्याची चिन्हे आहेत.
बालेकिल्ला असतानाही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक रथी-महारथींनी पक्ष सोडला. राज्याबरोबरच जिल्ह्यात पक्षाची पडझड सुरू होती. पक्षाच्या कठीण काळात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठ्या विश्वासाने बळीराम साठे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदी कमान सोपवली होती. मात्र, राज्यात सत्ता आल्यानंतर काहींनी साठे यांनाच त्रास देण्याचे काम सुरू केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. त्यातूनच साठे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. आता साठे यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.