Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari
Udayanraje Bhosale, Bhagat Singh Koshyari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : पुढचा मोर्चा आझाद मैदानावर ; रायगडावरून उदयनराजेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा

सरकारनामा ब्युरो

Udayanraje Bhosale :"राज्यपाल कोश्यारी हे कधीच मोठे नव्हतेच, राज्यपाल हे सन्मानाचे पद आहे. शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. प्रोटोकॅाल बोलून राज्यपालांना पाठिशी घालतात. चुक ही चुकच आहे," अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांना पाठिशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सुनावले.

"राज्यपालांवर पांघरुन घालणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, पण याबाबत कुणीही ठामपणे व्यक्त करीत नाही," अशा शब्दात शिवरायांचे वंशज, खासदार उदयनराजे यांनी विरोधकांना सुनावलं. "पुढचा मोर्चा आझाद मैदानावर असेल," असे उदयनराजे यांनी आज जाहीर केले. महाराष्ट्राभर ठिकठिकाणी फिरणार असून विविध लोकांना भेटणार आहे, असे उदयनराजे म्हणाले.

'निर्धार शिवसन्मानाचा' या मेळाव्यात खासदार उदयनराजे हे आज रायगडावर आहेत. शिवरायांच्या समाधीला वंदन करून मेळाव्याला संबोधित करताना उदयनराजेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली. शिवाजी महाराज यांच्यावर बेताल व्यक्तव्य करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला.

उदयनराजे म्हणाले, "देशाला आदर्श विचार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यातून अवमान केला जात आहे. त्याचे समर्थन करण्याचे धाडसही केल जात आहे. मात्र, शिवरायांचा अपमान सहन करणार नाही,"

उदयनराजे म्हणाले, "चित्रपट, लिखाण तसेच भाषणांच्या माध्यमातून राजेंची विटंबना होतेय. काही जणांकडून त्याचे समर्थन करण्याचे धाडस दाखवले जात आहे. राज्यपालांना असे म्हणायचे नव्हते, त्यांचा असा उद्देश नव्हता, असा बचाव केला जात आहे. या लोकांना लाज वाटली पाहीजे. शिवरायांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही,"

नेते फक्त स्वार्थी

"राजकीय पक्ष स्वार्थी झाले आहेत. नेते फक्त स्वार्थ पाहतात. सत्तेत आलो पाहिजे असे शिवाजी महाराजांना कधी वाटलं नाही. सध्या प्रत्येकजण प्रतिक्रियावादी झाला आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केली जात आहे," असे उदयनराजें म्हणाले.

आम्ही प्रतिक्रिया वादी झालो..

"या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. आणि आम्ही मुग गिळून पाहत बसलो आहोत. हीच आमची चूक झाली. राजेंचा अपमान झाला म्हणून आम्ही केवळ प्रतिक्रिया देत आहोत. आम्ही प्रतिक्रिया वादी झालो आहोत," अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपालांना त्यांची जागा दाखवा..

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची खिल्ली उडवण्यापर्यंत राज्यपालांची मजल गेली. आम्ही हे पाहात बसू काय? भगतसिंह कोश्यारी हे मोठे माणूस कधीच नव्हते. आता तर शिवरायांचा त्यांनी एकदा नव्हे दोनदा अवमान केला. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले, अशा सर्वांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT