Satara DCC bank, MP Udayanraje bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंचा हल्लाबोल; नाकर्त्या संचालकांना दणका द्या...

सेवा सोसायट्यांच्या सचिवांनी रात्रंदिवस बसून खातेदारांची माहिती बॅन्केला मुदतीत दिली. तरी सुध्दा बॅन्केने विमा कंपनीला ग्रुप इन्शुरन्सचा प्रिमियमच भरला नाही. यातून त्यांनी यशवंत विचारांना तिलांजलीच दिली.

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : शेतकरी मेडिकल ग्रुप इन्शुरन्स योजना जुलैपासून लागु केल्याचे एप्रिलमध्ये जिल्हा बँकेने जाहिर केले होते. सोसायटी थकबाकी नसावी अशी यासाठी मुख्य अट लादली. सभासदांनी विम्याचा लाभ मिळेल म्हणून सोनं-नाणं गहाणवट करुन, थकबाकी भरली. परंतु, जाहिर केलेल्या ग्रुप इन्शुरन्सचा प्रिमियमच करंटया पदाधिका-यांनी भरला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून हजारो सभासद शेतकरी थकबाकी भरुन, दवाखाना बाबींवर खर्च करीत आहेत. सभासदाला नागवं करण्याचंच पाप संबंधित संचालकांनी केले आहे. अस्मानी संकटाचा शेतकरी सामना करीत असतानाच सुलतानी संकट बँकेच्या कोणा नाकर्त्यांमुळे ओढावले आहे, त्यांना आता मताचा दणका दया, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

उदयनराजेंनी आज पुन्हा जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक व पदाधिकाऱ्यांवर ग्रुप विमा योजनेवरून टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, मोठा गाजावाजा करीत माहितीपत्रके, हजारो भित्तीपत्रके लावून कै. यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोसह जिल्हा बॅन्केने शेतकरी मेडिकल ग्रुप इन्शुरन्स योजना एप्रिल २०२१ मध्ये जाहिर केली. त्याचा हप्ता इन्शुरन्स कंपनीला बॅन्केच्या स्वनिधीतुन भरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३१ जुलै २०२१ पर्यंत सेवा सोसायटीचे सर्व प्रकारच्या घेतलेल्या कर्जाची थकबाकी नसावी अशी अट घातली. जे पात्र ठरतील त्यांच्या व त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या एका व्यक्तीचा दवाखान्याच्या खर्चाची हमी घेतल्याचे जाहिर केले होते.

संचालक मंडळाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार ३१ जुलै २०२१ रोजी थकबाकी नसलेल्या खातेदारांची माहिती बॅन्केने सेवा सोसायट्यांकडून मागविली. कोरोनाच्या काळात कोरोनासह अन्य दुर्धर आजार झाल्यास आधीच समस्यांच्या गर्तेत असलेल्या शेतकरी सभासदांनी आजारपणाच्या भितीने किडूक-मिडुक जोडून दागदागिने गहाण ठेऊन प्रसंगी मोडून सोसायट्यांची थकबाकी भरली. या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असलेल्या सुमारे दोन लाख ५३ हजार व त्यांच्यावर अवलंबुन असलेली एक व्यक्ती अशा सुमारे पाच लाख व्यक्तींची पात्र यादी तयार केली.

सेवा सोसायट्यांच्या सचिवांनी रात्रंदिवस बसून खातेदारांची माहिती बॅन्केला मुदतीत दिली. तरी सुध्दा बॅन्केने विमा कंपनीला ग्रुप इन्शुरन्सचा प्रिमियमच भरला नाही. यातून त्यांनी यशवंत विचारांना तिलांजलीच दिली. त्यामुळे आज कित्येक सभासदांनी ज्या कोणावर आजारपण ओढावले त्यांनी स्वतःच सर्व निभावून नेले आहे. योजनेची घोषणा करायची, अमिष दाखवायचे, परंतु कार्यवाही शून्य करायची हे कसले यशवंत विचार, असा प्रश्नही उदयनराजेंनी उपस्थित केला आहे. पातळयंत्री व्यक्तीच्या अकार्यक्षमतेमुळे सभासदांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सभासदांच्या तळतळाटाचा जाब संबंधितांना विचारायची वेळ आली आहे. जे काही आहे ते इथेच फेडायचे आहे. हे पाप कुठे फेडणार, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनात सभासदांना मदत झाली असती....

शेतक-यांसाठी मेडिक्लेम योजना २०१० पासून सुरु करण्यात आली होती. तथापी, पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजना लागू झाल्याने बॅन्केने स्वतःची विमा योजना २०१६ च्या दरम्यान बंद केली. जर ही योजना सुरु असती तर कोरोनाच्या महामारीत सापडलेल्या अनेक सभासदांना त्यांचा आर्थिक टेकू मिळाला असता. केंद्राच्या या दोन विमा योजनांबाबत सभासदांनी वार्षिक प्रिमियम रुपये १२ आणि रुपये ३३० विहित कागदपत्रासोबत भरण्याबाबत सभासदांचे कोणतेही प्रबोधन अथवा जागृती बॅन्केमार्फत केली नाही. यासारखे दुसरे दुर्दैव कोणते, असेही उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT