Kolahapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढील दोन महिने राजकीय आरोप प्रत्यारोपात कोल्हापूर जिल्हा राज्याच्या केंद्रस्थानी राहणार आहे. एकीकडे या निवडणुकींचा धुरळा उडत असताना भाजप आणि काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
पुढील दोन वर्षात होणाऱ्या या निवडणुकीला दोघांनीही आतापासूनच बीज पेरली आहेत. जिल्ह्यातील 13 नगरपालिका, नगरपंचायत, दोन महानगरपालिका, 1 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतींची संख्या धरून जवळपास 502 दोन मते या निवडणुकीत कामी येणार आहेत. त्यामुळे आत्तापासूनच त्यांच्या जोडण्या, तयारी आणि दौऱ्याने वेग घेतला आहे.
जिल्ह्यातील 13 नगरपालिकांमध्ये जवळपास 276 इतके मतदान असल्याने काँग्रेस आणि भाजपकडून देखील तितकेच या निवडणुकीत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असणारी जयसिंगपूर नगरपालिका, त्या पाठोपाठ कागलमध्ये देखील महायुतीमध्ये वरचढ ठरणार आहे. मात्र काँग्रेसकडून जयसिंगपूर नगरपालिका मिळवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आतापासूनच लक्ष केंद्रित केले आहे. तर भाजपने अनेक ठिकाणी आपल्या घटक पक्षासह मित्रपक्षातील आणि पदाधिकाऱ्यांना आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गेल्यावेळी जी विधानपरिषद निवडणूक झाली त्या निवडणुकीला आमदार अमल महाडिक यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते आमदार सतेज पाटील यांचा विजय सोपा झाला. त्यावेळी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली तर ही परिस्थिती उलट आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीची आखणी गुपितपणे भाजपकडून सुरू आहे. ही निवडणूक अद्याप दीड वर्षावर असली तरी आतापासूनच भाजप आणि काँग्रेसकडून जिल्ह्यातील एकूण नगरपालिकांसह महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सभापतीच्या एकूण 502 जागांवर विशेष लक्ष असणार आहे.
गेल्या निवडणुकीत भाजप (BJP), महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने लक्षणीय जागा मिळवल्या होत्या. पण त्यावेळी सतेज पाटील, हसन मुश्रीफ एकत्र होते. तर निवडणुकीत राजेश क्षीरसागर त्यांच्यासोबत गेले होते. राज्यात महायुतीचे भक्कम सरकार असल्याने यावेळी क्षीरसागर यांनी महापालिकेसाठी कंबर कसली आहे. इचलकरंजीमधील पारंपरिक विरोधक माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर एकत्र आले आहेत.
शिरोळ तालुक्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने हे एकत्र आहेत. त्यांना माहितीची साथ आहे. तर चंदगड नगरपालिकांमध्ये महायुतीचे प्राबल्य आहे. जिल्ह्यात दहा ही जागांवर महायुतीचे आमदार असल्याने त्याचा प्रभाव या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे सहाजिकच या निवडणुकीवर राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
कोल्हापूर महापालिका- 81
जिल्हा परिषद सदस्य- 68
इचलकरंजी महापालिका- 65
जयसिंगपूर- 26
कागल- 23
गडहिंग्लज- 22
हुपरी- 21
शिरोळ- 20
पेठवडगाव- 20
कुरूंदवाड- 20
मुरगूड- 20
मलकापूर- 20
पन्हाळा- 20
आजरा- 17
हातकणंगले- 17
चंदगड- 17
नगराध्यक्ष- 13
सभापती- 12
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.