पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र...; पण नक्की घडले काय?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : कोल्हापुरात महाडिक गट आणि पाटील गट यांचा राजकीय संघर्ष राज्याला सर्वश्रुत आहे. दोघांच्यातील टोकाचा संघर्ष वेळोवेळी अनुभवायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूक पासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने-सामने आला आहे. आमदार सतेज पाटील विरुद्ध राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यातील संघर्ष ही तितकाच टोकाचा आहे, पण एका कार्यक्रमानिमित्त हे दोघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

कृषी विभागाच्या वतीने आज कसबा बावडा प्रशिक्षण विभागाचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित पार पडले. कृषी विभागाच्या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना निमंत्रित करण्यात आले होते. सुरुवातीला सतेज पाटील हे गेट बाहेर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची वाट पाहत होते, तर गेटच्या आतमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे पालकमंत्री मुश्रीफ यांची वाट पाहत होते.

मुश्रीफ यांचे आगमन झाल्यानंतर सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांचे स्वागत केले. तर मुश्रीफ यांनी दोघांना सोबत घेऊन तिघांनी एकत्र फेटे बांधून घेतले. धनंजय महाडिक हे मुश्रीफ यांच्या उजव्या बाजूला तर सतेज पाटील हे डाव्या बाजूला बसून फेटे बांधून घेत होते. माध्यमांचे कॅमेरे बघताच दोघांच्याही चेहऱ्यावर हसरे भाव दिसत होते. एकाच वेळी तिघांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. अनेक वर्षांनंतर बंटी आणि मुन्ना एकत्र दिसल्याने कार्यक्रमस्थळी चर्चेचा विषय बनला होता.

नऊ वर्षांनी पुन्हा योग

2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार होते. त्यावेळी आघाडी धर्म म्हणून सतेज पाटील यांनी महाडिक यांना मदत करावी, यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी मध्यस्ती केली होती. त्यावेळी कसबा बावड्यातील सतेज पाटील यांच्या घरी मुश्रीफ यांच्यासोबत धनंजय महाडिकदेखील उपस्थित होते. त्यावेळी महाडिक हे मुश्रीफ यांच्या उजव्या बाजूला आणि सतेज पाटील हे डाव्या बाजूला बसले होते.

मी ज्या-ज्या ठिकाणी असेन तिथं हे दोघे एकत्र असतील. शहराच्या विकासासाठी बंटी आणि मुन्ना यांचं सहकार्य घेणार आहे. शरद पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण महायुतीच्या दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करेन, अशी बोलकी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

Edited By - Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT