Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagar News: पवारांचा आदेश रोहितदादा मोडणार नाहीत; 'नगर दक्षिण' लढविणार ?

Ahmednagar Lok Sabha elections 2024: काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी या जागेवर काँग्रेससाठी दावा केला होता.

राजेंद्र त्रिमुखे

Nagar : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. बहुतांशी पक्षांनी आपापले उमेदवार निवडले असले तरी कुठे आघाडी धर्म, तर कुठे महायुती धर्म पाळण्यासाठी उमेदवारांची घोषणा अधिकृतपणे केलेली नाही. अशात नगर दक्षिण लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटच लढवेल, असा दावा जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केला आहे. आमचा उमेदवार फायनल आहे, अशीही माहिती त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यापासून नगर दक्षिण लोकसभेची जागा राष्ट्रवादी, तर नगर उत्तरेतील जागा काँग्रेस लढवत आली आहे. त्यामुळे नगर दक्षिण मतदारसंघावर याही वेळी राष्ट्रवादीचा दावा स्पष्ट आहे. वास्तविक 2019 ला राष्ट्रवादी नगर दक्षिणेची जागा पराभूत झाली. त्यावेळी भाजपमध्ये दाखल होत सुजय विखे यांनी संग्राम जगताप यांचा दणदणीत पराभव केला होता. मात्र, असे असले तरी या मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकत आहे, हे राजकीय विश्लेषकही मान्य करतात.

2019 ला जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी पक्षाने (NCP) विजय मिळवत आपली ताकत दाखवून दिली. यातील पारनेर, नगर, कर्जत-जामखेड हे मतदारसंघ नगर दक्षिणेतील आहेत. त्यामुळे 2024 साठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने दावा कायम ठेवला आहे. याला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दुजोरा देत राष्ट्रवादी 100 टक्के ही जागा लढवणार असे स्पष्ट केले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी या जागेवर काँग्रेससाठी दावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मधील पराभवाचा अनुभव पाहता 2024 साठी पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना कामाला लागण्याचे आदेश तीन वर्षांपूर्वी दिले होते. लंके यांनीही नगर दक्षिण मतदारसंघ अडीच-तीन वर्षांपासून पिंजून काढण्यास सुरुवात केली. लंके यांचे नाव पूर्ण चर्चेत असताना मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षातील उभ्या फुटीत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली. मध्यंतरी मुंबईतील नगर दक्षिण जागेसाठी उमेदवारांच्या झालेल्या चाचपणीत रोहित पवार, राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अशा नावांची चर्चा झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नीलेश लंकेची भूमिका अस्पष्ट!

नीलेश लंके यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसारच लोकसभेची तयारी सुरू केल्याचे बोलले जाते. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात लंके अजित पवार गटात आहेत. लंके लोकसभेच्या तयारीत असल्याचे दिसून येत असले तरी अजित पवार जो आदेश देतील तसा निर्णय घेऊ असे सांगत आहेत. मध्यंतरी अजित पवार गटाच्या संभाव्य लोकसभेच्या जागांवर बातम्या पुढे आल्या होत्या. त्यात नगर दक्षिणेच्या जागेचा उल्लेख नसल्यामुळेही चर्चा झाली. या परिस्थितीत नीलेश लंके यांची भूमिका अस्पष्ट दिसून येत आहे. यावर राजेंद्र फाळके यांनी आमचा उमेदवार रोहित पवार आहेत, ते (नीलेश लंके) जर आमच्याकडे आले तर त्यानंतर त्यावर चर्चा होऊ शकते. आजच्या परिस्थितीत लोकसभेची जागा लढवणार असून, रोहित पवार उमेदवार असू शकतील, असे फाळके यांनी स्पष्ट केले आहे.

यात सक्षम उमेदवार कोण यावर चर्चा होऊन रोहित पवार यांच्या नावावर मोठी चर्चा झाली. त्यांच्या नावाला पक्षाचे प्रताप ढाकणे, फाळके, माजी आमदार राहुल जगताप अशा बहुतेकांनी सकारात्मकता दाखवली. राहुल जगताप यांनी तर माझ्या श्रीगोंदा तालुक्यातून त्यांना लीड देऊ, नाही दिला तर विधानसभेची उमेदवारी मागणार नाही असे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पवार यांचे नाव अंतिम मानले जात आहे. शरद पवारांचा आदेश रोहित पवार मोडणार नाहीत आणि ते सक्षम उमेदवार असल्याचे फाळके यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT