Rajendra Nagawade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बेलवंडीत अण्णासाहेब शेलारांच्या विरुद्ध नागवडे यांचा मास्टरप्लॅन

नागवडे कारखाना निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्या पॅनेलने आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नहाटा यांच्या पॅनेलचा पराभव केला.

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांच्या पॅनेलने आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ), जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नहाटा यांच्या पॅनेलचा पराभव केला. आता जिल्ह्यात विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात राजेंद्र नागवडे यांनी विरोधकांना बंदोबस्त करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केला आहे. ( Nagwade's masterplan against Annasaheb Shelar in Belwandi )

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी नागवडे कारखाना निवडणुकीत जोरदार तयारी केली होती. मात्र, नागवडे गटाचा मोठा विजय झाला. त्यामुळे आता शेलार यांनाच आगामी जिल्हा परिषदेच्या बेलवंडी गटात रोखण्यासाठी काँग्रेसची जय्यत तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. शेलार यांच्याविरुध्द दीपक नागवडे यांनी उमेदवारी करावी अशी मागणी होत आहे. त्यांच्यासह वांगदरीचे सरपंच आदेश नागवडे व पृथ्वीराज राजेंद्र नागवडे यांचीही नावे चर्चेत आहेत.

कारखाना निवडणुकीत नागवडे कुटूंबाला अण्णासाहेब शेलार यांनी टार्गेट केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे तक्रारी घेवून जाण्यात शेलार हेच आघाडीवर होते. त्यामुळे शेलार विरुध्द नागवडे या संघर्षाची ठिणगी पडली होती.

कारखाना निवडणुकीत नागवडे गटाने मोठा विजय मिळवितानाच शेलार यांचाही पराभव झाला होता. शेलार यांनी दिलेला त्रास नागवडे गटाचे कार्यकर्ते सहजासहजी विसरणार नसल्याचे दिसते. त्यामुळेच आता बेलवंडी जिल्हा परिषद गटात शेलार यांना काहीही करुन रोखण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे.

बेलवंडी हा गट नागवडे व शेलार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा समजला जातो. गेल्यावेळी येथून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी विक्रमी विजय मिळविला होता. तेथून आता पुन्हा शेलार निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत.

आरक्षण योग्य पडले तर शेलार यांच्या विरुध्द शिवाजीराव बापू नागवडे यांचे धाकटे चिरंजीव दीपक यांनी मैदानात उतरावे अशी मागणी जोर धरीत आहे. तथापि ते निवडणूक लढतील की नाही हे सांगता येत नसले तरी त्यांनीच लढावे यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी मात्र आहे.

दरम्यान दीपक नागवडे यांच्यासह वांगदरी गावचे सरपंच व नवा चेहरा म्हणून आदेश नागवडे यांच्याही उमेदवारीची मागणी होत आहे. राजेंद्र नागवडे यांचे पुत्र पृथ्वीराज यांच्याही नावाची चर्चा आहे. एकंदरच शेलार यांना नागवडे कुटुबांतील व्यक्तीविरुध्दच लढावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मध्यंतरी शेलार यांनीच हिम्मत असेल तर नागवडे कुटूंबाने आपल्याविरूद्ध निवडणूक लढवावी असे आव्हान दिले होते, ते प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे आहेत.

याबाबत आमचे नेते राजेंद्र नागवडे निर्णय घेतील. दीपकशेठ नागवडे यांनी निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे हे खरे आहे. नेते जो आदेश देतील तो पाळून निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढू.

- आदेश नागवडे, सरपंच, वांगदरी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT