Rajendra Nagawade
Rajendra Nagawade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नागवडेंचे पुढचे टार्गेट काष्टी

संजय आ. काटे

श्रीगोंदे (जि. अहमदनगर ) : श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मागील महिन्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते व बाळासाहेब नाहाटा यांचा पराभव केला होता. या विजयामुळे नागवडे यांच्यात हत्तीचे बळ आले आहे. पाचपुते कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या काष्टी भागातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूकही जिंकण्यासाठी राजेंद्र नागवडे ( Rajendra Nagawade ) यांनी रणनीती आखली आहे. ( Nagwade's next target is Kashti )

काष्टी येथे नागवडे कारखाना संचालक मंडळ, नवनिर्वाचित अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव पाचपुते होते. या प्रसंगी राजेंद्र नागवडे यांनी आगामी विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकी विषयी सूचक वक्तव्य केले.

राजेंद्र नागवडे म्हणाले, सहकारी संस्था कशी चालवावी, याचे उत्तम उदाहरण शिवाजीराव बापू नागवडे यांनी समाजापुढे ठेवले आहे. नागवडे कारखान्याची सत्ता नागवडे कुटुंबाकडेच ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. काही लोक सहकाराला खासगीसारखे चालवितात. काष्टी सेवा संस्था वाढविण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न आहेत. मात्र, तेथे हुकूमशाही सुरू आहे. ती उद्ध्वस्त करून, चांगल्या विचारांच्या लोकांच्या हाती सत्ता देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचा शब्द राजेंद्र नागवडे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

नागवडे म्हणाले, की बापू गेल्यानंतर त्यांनी वाढविलेल्या कारखान्यातून नागवडे कुटुंबाला हद्दपार करण्याची भाषा झाली. आमच्यावर बिनबुडाचे आरोप करून, नेत्यांपुढे आम्ही आता संपलो आहोत अशा बढाया मारल्या. बापूंच्या जिवावर मोठेपणा भोगला त्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतल्याचे शल्य आहे. आपल्याला एकटे पाडून कारखान्याची सत्ता हस्तगत करण्याचा डाव आखला गेला. त्यात लांबचे व जवळचे सर्वच सामील झाले. मात्र, सभासद आपल्यासोबत राहिले. त्यामुळे झालेल्या विजयाची नोंद राज्याला घ्यावी लागली.

कारखाना आमच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी यंत्रणा राबविणाऱ्या नेत्यांना, त्यांच्या संस्थेत काय चालले आहे हे दाखवून देणार असल्याचे सांगत राजेंद्र नागवडे म्हणाले, की काष्टी सेवा संस्था वाढविण्यासाठी बापूंसह (स्व.) शिवरामअण्णा पाचपुते यांनी जिवाचे रान केले. मात्र, आता काही लोक स्वत:ला तेथील मालक समजायला लागलेत. आमच्याविरुद्ध आगपाखड केली, आता त्यांची वेळ आहे. काष्टी सेवा संस्थेची निवडणूकप्रक्रिया सुरू झाली. तेथे आपण लक्ष देणार आहोत. चांगल्या लोकांच्या हाती ती संस्था जावी, हा प्रयत्न असतानाच, तेथील सत्ताधाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी खास मिशन राबविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, कैलास पाचपुते, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, विठ्ठल काकडे, दीपक नागवडे, राकेश पाचपुते, आबा कोल्हटकर, शिवाजी पाचपुते, ज्ञानदेव पाचपुते, दत्तात्रेय गावडे, उरमुडे गुरुजी, शिवप्रसाद जगताप, बापू पाचपुते, जालिंदर पाचपुते, नवनाथ राहिंज, प्रा. सुनील माने, संजय काळे, काशिनाथ काळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT