NCP Activist
NCP Activist  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

केतकी चितळेचे समर्थन : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सदाभाऊंच्या अंगावर धावून गेले!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेचे समर्थन करणाऱ्या माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी सोलापुरात आज (ता. १६ मे) तीव्र निषेध केला. काही उत्साही कार्यकर्त्यांनी आमदार खोत यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना अडवले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोत यांचा समोरच निषेध नोंदवत त्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. (NCP Activist protested against Sadabhau Khot in Solapur)

पवार यांच्यावर केतकी चितळे हिने केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी चितळे हिचे समर्थन केल्याने सोलापुरात आलेल्या खोत यांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार खोत यांचा निषेध केला. आमदार खोत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात असल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टाळ व मृदंग घेत शासकीय विश्रामगृह गाठले.

आमदार खोत सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदंग घेऊन शासकीय विश्रामगृहात आले. आमदार खोत ज्या रूममध्ये बसले होते, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन गोंधळ घातला. पांडुरंगा खोत यांना सद्बुद्धी दे. पवार साहेब अंगार है... बाकी सब भंगार है..च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या.

याबाबत आमदार खोत म्हणाले की, केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टचे व शरद पवार यांच्यावरील टिकेचे मी समर्थन केले नाही. चितळे हिच्यावर हल्ला होऊन देखील तिने न्यायालयात आणि पोलिसांसमोर ज्या पध्दतीने बाजू मांडली, त्याचे मी कौतुक केले. राज्यात कोणी काही बोलले की त्याला महाविकास आघाडी सरकार जातीयवादी ठरवत आहे. तुम्ही बोललात की पुरोगामी आणि आम्ही बोललो की जातीयवादी, हे बरोबर नसल्याचेही आमदार खोत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT