Ahmednagar NCP  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis Update : साहेबांकडून हकालपट्टी; तर दादांकडून स्वागत आणि लगेच पदभार !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाकडून अहमदनगरचे शहर जिल्हाध्यक्ष आणि शहर कार्याध्यक्ष यांची हकालपट्टी केली. यानंतर दोनच दिवसात त्यांच्यावर अजित पवार गटाकडून त्याच पदांची जबादारी सोपवण्यात आली. यामुळे जिल्ह्यात आता 'दादाराज' सुरू झाले असून साहेबांच्या गटाला अस्तित्वासाठी झगडावे लागणार असल्याची चर्चा आहे. (Latest Political News)

पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पक्ष सरचिटणीस रवींद्र पवार यांनी १८ जुलै रोजी राज्यातले पक्षातील जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, शहर कार्याध्यक्ष अशा तब्बल २१ पदाधिकाऱ्यांची एकाचवेळी हकालपट्टी केली. यात अजित पवार गटात गेलेले नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे खंदेसमर्थक शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते आणि शहर कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांचा समावेश होता.

त्यांना मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नियुक्तीपत्र देण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पदावर प्रा.माणिकराव विधाते तर शहर कार्याध्यक्षपदावर अभिजात खोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोडक्यात पदे पूर्वीचीच असली तरी आता गट बदलले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोरी प्रकरणानंतर शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते व कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांची पदावरून उचलबांगडी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे तातडीने शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रा. माणिकराव विधाते व कार्याध्यक्ष पदी अभिजित खोसे यांची नियुक्ती केली आहे. यामुळे नगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गट आता खऱ्या अर्थाने 'दादा' झाला असून शरद पवार गटाला नगर शहरात पक्ष उभारणी करणे मोठे दिव्य असणार असे मानले जात आहे.

नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी कार्यकर्त्यांचे शहर आणि उपनगरांत एकहाती मोठे जाळे विणले आहे. यात तरुण कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग आहे. 'संग्रामभैय्या' हाच पक्ष असे मानणारे कार्यकर्ते ही संग्राम जगताप यांची मोठी ताकत असून यापुढे विरोधीपक्ष विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तोकडे अशी परस्थिती आहे. त्यात आमदार जगताप अजित दादांच्या गटात असल्याने २०२४ विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

विधानसभेसाठी मोठ्या तयारीत असलेला भाजप पक्ष आणि त्यांचे इच्छुक उमेदवार यांच्या उमेदवारीचे काय असा प्रश्न शहरात चर्चेत आहे. माजी शहरजिल्हाध्यक्ष आणि भाजपचे नगर शहर विधानसभा प्रमुख भैय्या गंधे यांनी 'कितीही उलथापालथ झाली तरी शहराचा लोकप्रतिनिधी हा ओरिजनल भाजप पक्षाचाच होईल' अशी ग्वाही भाजप कार्यकर्त्यांना दिलेला आहे. यामुळे एकीकडे आमदार संग्राम जगताप पक्ष पातळीवर मजबूत असले तरी महायुतीतील जागावाटप कळीच्या प्रश्नावर भविष्यात काय होणार याबद्दल आताच अनेकजण आडाखे बांधतांना दिसत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT