Kiran Lahamate Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Crisis And Kiran Lahamate : ...म्हणून पुन्हा अजितदादांकडे जाण्याचा निर्णय घेतला ! आमदार लहामटेंनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

Kiran Lahamate Joins Ajit Pawar Group : अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी मोठा घुमजाव करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी दोन वेळा भूमिका बदलली होती. सर्वात प्रथम लहामटे अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. यानंतर आता पुन्हा ते अजित पवार यांच्या गोटात सहभागी झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यभर चर्चांना उधाण आले आहे. (Latest Political News)

दरम्यान, आपण निर्णय का बदलला याबाबत आमदार लहामटे यांनीच खुलासा केला आहे. याबाबत किरण लहामटे म्हणाले की, "अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित होतो, मात्र सर्व समजल्यानंतर तेथून माघारी आलो. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी काहींनी भावनिक साद घालून शरद पवार यांच्यासोबत तर काहींनी अजितदादांना साथ देण्याचे सांगितले. तर अनेकांनी कुठेही जा पण तुमचे नुकसान झाले नाही पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यावेळी मीही भावनिक होतो. त्यामुळे शरद पवारांना साथ दिली."

आता मतदारसंघातील विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती लहामटे यांनी दिली. आमदार लहामटे म्हणाले, "मतदारसंघातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये रोषाचे वातावरण आहे. बसस्थानक परिसरातबाबत सोशल मीडियावर टोलेबाजी सुरू आहे. कारखान्याचा रस्ताही खराब आहे. अर्थात ही स्थिती या तीन वर्षात झालेली नाही. मात्र आमदारांना उद्देशून सर्व प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ही कामे यापूर्वीच व्हायला हवी होती. याला उत्तर देण्याची वेळ मात्र माझ्यावर आली. आता शहरातील ४७ कामांचा प्रस्ताव दाखल आहे. या मतदारसंघातील नागरिकांनी आता विकासकामांबाबत रेटा लावून धरला आहे."

दरम्यान अजित पवारही माझ्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही खुलासाही लहामटे यांनी केलेा. लहामटे म्हणाले, "माझ्यासाठी अजितदादांनी माणसे पाठविली होती. याबाबत संबंधित लोक पाठपुरावा करत होती. माझ्या भेटीगाठी घेत होती. त्यांनी फोनवरून अजित पवार यांच्याशी संपर्क घडवून आणला. दरम्यान, अजितदादांनी माझ्या पत्नीलाही फोन करून संवाद साधला. ते वारंवार सांगत होते की तुम्ही फक्त चर्चेसाठी या. त्यानुसार त्यांची भेट घेतली. त्यावेळी मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय, एमआयडीसीसह इतर विकासकामांबाबत चर्चा झाली. येथील काही प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी वनाधिकाऱ्यांशी चर्चा केली."

या भेटीनंतर मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार किरण लहामटे यांनी स्पष्ट केले. लहामटे म्हणाले, "मतदारसंघातील विकासासाठी निधी मिळत असेल, विकासकामे होणार असतील आणि २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी मिळत असेल तर अजितदादासोबत गेले पाहिजे, असे मतदारसंघातील नागिरकांनी सांगितले. अजितदादा आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. यापुढेही तालुक्याच्या विकासासाठी कितीही जणांच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या तरी ते करीन."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT