NCP (Sharad Pawar) leader Jayant Patil continues to counter BJP's political offensive in Sangli despite facing multiple challenges. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : जयंत पाटील 'चक्रव्यूहात'! भाजपचे सलग पाच वार, तरीही शरणागती नाही : उलट 'फाइटबॅक'च्या तयारीत

Jayant Patil : सांगलीत जयंत पाटील यांच्या राजकीय बालेकिल्ल्यांवर भाजपकडून सातत्याने आव्हाने उभी राहत आहेत. मात्र वाढत्या दबावानंतरही त्यांनी माघार न घेता कायदेशीर आणि राजकीय लढाई सुरू ठेवली आहे.

Rahul Gadkar

Jayant Patil News : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना चक्रव्यूहात अडकवण्याचे काम महायुतीकडून सातत्याने सुरू आहे. आमदार पाटील यांच्या सत्तास्थानांवर मागील काही दिवसांत भाजपकडून हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत त्यांच्या पाच सत्तास्थानांना भाजपने लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

या हल्ल्यामुळे तब्बल 17 वर्षे मंत्री राहिलेले, रेकॉर्डब्रेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेले पाटील आता व्यथित झालेले दिसत आहेत. याच अगतिकतेतून ते पहाटे तीन वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. दुसऱ्या बाजूला एवढं होतं असूनही जयंत पाटील अद्याप भाजपच्या हाताला लागले नाहीत हे विशेष....

मागील काही दिवसांपासून स्थानिक राजकारणापासून दिल्लीच्या राजकारणापर्यंत रोज एक फासा आमदार पाटील यांच्यासमोर टाकला जात आहे. त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठीच ही यंत्रणा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.

आधी राज्य सरकारने सांगली बाजार समिती बरखास्त करून तिचे त्रिभाजन केले. मग पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील जयंत पाटील यांच्या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांना फोडले. भाजपच्या आमदारांकडून सातत्याने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्ष्य केले जाते.

कधी बँकेच्या चौकशीची मागणी होत असते. तर कधी नोकर भरती आणि अन्य प्रकारांमुळे सातत्याने कारवाईची मागणी सुरु असते. नुकतेच उरण ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवण्यात आले. तर दोन दिवांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीचीं निवड रद्द करण्यात आली.

यासारख्या अनेक प्रकरणातून जयंत पाटील यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे. रोज होणाऱ्या या राजकीय हल्ल्यांमुळे जयंत पाटील यांचा गट देखील कुमकवत झाला आहे. त्यामुळे कार्यकर्ता टिकवणे हे आमदार पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान बनले.

अशातच पुन्हा एकदा सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष करण्याच्या गुप्त हालचाली देखील सुरू आहेत. सदस्यांना फोडण्याची पुढची रणनीती भाजपची असू शकते. मागील आठवड्यात भाजपचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी एक बैठक घेतली होती. यात जिल्हा परिषदेमध्ये आक्रमक व्हा असा संदेश दिला होता. आता हे कोणत्या अर्थाने ते येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

याच आगतिकतेतून जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. महायुतीकडून रोज नव्या प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी जयंत पाटील यांनी अद्याप तरी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलट त्यांनी लढण्याची तयारी दाखवल्याचे दिसून येत आहे.

न्यायालयात जाऊन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीचा मार्ग रिकामा केला. मिरज पंचायत समिती सभापती निवडी रद्द झाल्यानंतर काही मोजक्याच नेत्यांची बैठक शनिवारी रात्री पार पडली. यात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात भाजपच्या आव्हानांना प्रतीआव्हान देण्याचा प्रयत्न जयंत पाटील करताना दिसत आहेत. पण ते अजूनही शरण आल्याचे दिसत नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT