Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif: विलिनीकरणाबाबत मुश्रीफांनी दिले संकेत! सर्वांचे एकमत असेल तर एकत्र येऊ

दोन्ही राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांचे एकमत असेल तर एकत्र येण्यास काही हरकत नाही अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी मांडली.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 68 तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी ही निवडणूक 696 उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आज कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विलीनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघात चौकशी बद्दल भूमिका स्पष्ट केले. दोन्ही राष्ट्रवादीतील सर्व नेत्यांचे एकमत असेल तर एकत्र येण्यास काही हरकत नाही अशी भूमिका मंत्री मुश्रीफ यांनी मांडली.

अजित पवार यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असला, तरी त्यांच्या प्रती असलेली सहानुभूती मतदारांमधून व्यक्त होईल, असा विश्वास नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे, अशा मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून भावना व्यक्त करण्यात आल्या.

आमदार रोहित पवार यांनी १२ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत झालेल्या चर्चेवर खुलासा करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ म्हणाले की, विलिनीकरणाबाबतची चर्चा ही केवळ अजित दादांच्या पातळीवर झाली होती, त्यामध्ये आम्ही सहभागी नव्हतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सहमती दर्शवली, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास आमची हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या निधनानंतर उपस्थित झालेल्या शंकांवर भाष्य करताना मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्य व केंद्र सरकारने चौकशी सुरू केली असून विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यातील अहवालानंतर सर्व सत्य समोर येईल. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी हा केवळ अपघात असून त्यामध्ये अन्य काही नाही, असे स्पष्ट केले आहे. पवार कुटुंबीय एकत्रित असून, पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली तर तो कुटुंबीयांचा विषय आहे, त्यावर चर्चा करण्यासारखे काही नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले

अजितदादा अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहेत.त्यांनी जबाबदारीने पाऊल उचलले तर ते 'व्हिलन' कसे ठरू शकतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यामुळे त्यात इतरांनी लुडबुड करण्याची गरज नाही. आम्ही दुःखात असताना ही मंडळी विनाकारण टीका का करत आहेत? ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य घडले तेच बोललो आहे,'असे मुश्रिफ म्हणाले.

एकूणच,जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल १० वर्षांनंतर होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात पहिल्यांदाच या निवडणुका होत आहे. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT