MLA Jaykumar Gore and Shekhar Gore 
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरेंना शह देण्यासाठी राष्ट्रवादीची भावाशी हातमिळवणी?

भाजपप्रणित सर्वसमावेश पॅनेलने राष्ट्रवादीविरोधात आव्हान उभे केले आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Satara District Bank) निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पॅनेलला शह देण्यासाठी जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे. गोरे यांचे बंधू व शिवसेनेचे नेते शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्याशी हातमिळवणी करण्याबाबत राष्ट्रवादीची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपप्रणित सर्वसमावेशक पॅनेलची घोषणा केली आहे. तर शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी तिसऱ्या पॅनेलच्या माध्यमातून आव्हान निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी तब्बल २०० अर्ज दाखल झाले आहेत.

सर्व जागांवर अर्ज दाखल करत भाजपप्रणित सर्वसमावेश पॅनेलने राष्ट्रवादीविरोधात आव्हान उभे केले आहे. माण तालुक्यात माण बाजार समिती मध्ये आमदार गोरे विरुद्ध शेखर गोरे हे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. जिल्हा बँकेच्या सध्याच्या संचालक मंडळाविरोधात आमदार गोरे यांनी संधी मिळेल तेव्हा सडकून टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि सध्याचे सर्वसमावेशक पॅनेलच्या माध्यमातून जयकुमार गोरे याना तगडा आव्हान देण्यासाठी त्यांचेच बंधू आणि शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शेखर गोरे यांच्या माध्यमातून आमदार गोरेंना जिल्हा बँकेच्या बाहेर ठेवण्याचे स्वप्न राष्ट्रवादी पाहत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले तसेच शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनीही अर्ज दाखल केले आहेत. दोन-चार जागा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलच्या विरोधात भाजप प्रणित सर्वसमावेशक पॅनेल टाकण्याचा निर्धार केला आहे.

राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधील तीन उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये खरेदी विक्री संघ मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघातून राजेंद्र राजपुरे तसेच कृषी उत्पन्न प्रक्रिया संस्था मतदारसंघातून शिवरुपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT