sangram jagtap Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून महायुतीतील आमदाराचे सरकारविषयी मोठे वक्तव्य, सर्वांच्या भुवया उंचावल्या

Sachin Fulpagare

Maratha Aarakshan Protest : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सत्ताधारी महायुतीतील अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 'मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव कसा आणता येईल आणि विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करावी', असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

नगर तहसील कार्यालय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनाला आज महापालिकेतील नगरसेवकांनी पाठिंबा देत आपली भूमिका मांडली. आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज कोतकर, अविनाश घुले, कुमार वाकळे, मदन आढाव, दीपाली बारस्कर, संपत बारस्कर, शाम नळकांडे, रूपाली वारे, रवींद्र बारस्कर, विनीत पाऊलबुधे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर शीला शिंदे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, अजय चितळे, अजय बारस्कर, अजिंक्य बोरकर, सुरेश इथापे, सुरेखा सांगळे, अनुराधा येवले आंदोलनात सहभागी झाले होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील आंदोलनाला चांगली दिशा देत आहेत. ते ज्याप्रमाणे आंदोलनाला दिशा देतील, त्यापद्धतीने आम्ही कार्यवाही करत राहू. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारमध्ये राहून आम्ही दबाव आणत राहू. विशेष अधिवेशन बोलावू, त्यात मराठा आरक्षणावर सकारात्मक चर्चा करावी. यानंतर केंद्र सरकारला मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने शिफारस करावी. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहणार आहोत".

...त्यांना राम राम करा!

'मराठा समाजाने काढलेले क्रांती मोर्चा आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनात मुस्लिम समाजाने नेहमीच मदत केली आहे. आता निवडणुकांचे दिवस आहेत. या वेळी काही राजकीय लोक, पदाधिकारी मुस्लिम समाजाविषयी काही सांगायला येतील. यातून दंगल घडविण्याचा प्रयत्न होईल. अशा लोकांपासून सावध राहा. त्यांना राम राम करा', असे आवाहन नगरसेवक विनीत पाऊलबुधे यांनी केले.

मुस्लिमांचा पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध समाजाकडून पाठिंबा मिळत आहे. नगरमधील सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद साबीर अली मन्सूर अली यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी या वेळी मांडली. या पाठिंब्याचे स्वागत मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाने केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT