Sharad Pawar On Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Mushrif : कोल्हापुरात जाऊन पवारांनी मुश्रीफांचा हिशेब चुकता केला; म्हणाले, '' ईडीच्या नोटिशीला सामोरे जाण्याची ताकद...''

Kolhapur Politics : '' काही लोकांच्या घरी सीबीआयचे लोकं गेले,आयकर विभागाचे लोकही गेले...''

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur : काही दिवसांपूर्वी राज्याच्या काही नेत्यांना ईडीच्या नोटिशांचा दम दिला. त्याला काही लोकांनी तोंड दिले, पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे शूरांचे गाव आहे, ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शूरांचा आहे. ईडीची नोटीस आली तर त्याला सामोरे जाण्याची ताकद काही लोकं दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची होती. पण चित्र काही वेगळंच घडलं असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांना खोचक टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar)यांची शुक्रवारी कोल्हापूर येथील दसरा चौकात सभा झाली.यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधतानाच अजित पवार गटात गेलेल्या मुश्रीफांवर टीकेची झोड उठवली. पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून सत्तेचा वापर विरोधकांना त्रास कसा देता येईल यासाठी केला जात आहे.अनिल देशमुख, नवाब मलिक घाबरले नाहीत, संजय राऊत घाबरले नाहीत, पण काही लोकांनी भूमिका बदलली असेही पवार म्हणाले.

'' ईडीची नोटीस आली तर त्याला सामोरे जाण्याची ताकद...''

राज्याच्या राजकारणातील काही नेत्यांना काही दिवसांपूर्वी ईडीच्या नोटिशांचा दम दिला. त्याला काही लोकांनी तोंड दिले पण काही लोकांनी भूमिका बदलली.कोल्हापूर हे शूरांचे गाव आहे, ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शूरांचा आहे. ईडीची नोटीस आली तर त्याला सामोरे जाण्याची ताकद काही लोकं दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची होती. पण चित्र वेगळंच घडलं. कोल्हापुरात कुणाला तरी ईडीची नोटीस आली, आली का नाही नोटीस असा सवालही त्यांनी उपस्थितांना केला.

शरद पवारांनी कोल्हापूरच्या सभेतून हसन मुश्रीफां(Hasan Mushrif)वर चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, कोल्हापुरात काही लोकांच्या घरी सीबीआयचे लोक गेले, इन्कम टॅक्स विभागाचे लोकही गेले. त्यांनी काही काळ आमच्यासोबत काम केले, मला वाटले काहीतरी स्वाभिमान असेल. पण घरातल्या महिलांनी ज्याप्रकारे सांगितले की, आमच्यावर तुम्ही हल्ले करताय, टीका करताय, धाडी टाकतायत, त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. त्याला आमची तयारी आहे. ही एक भगिनी म्हणू शकते. पण त्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे, त्याने म्हटलेले मी काही ऐकले नाही असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी मुश्रीफांवर केला.

त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपसोबत जाऊ आणि ते म्हणतील तिथे बसू. आणि यातून आपली सुटका करुन घेऊ अशा प्रकारची भूमिका घेतली असा टोला पवारांनी मुश्रीफांना लगावला.

'' ...हे केंद्र सरकारचं, ईडी डिपार्टमेंटचं काम!''

पण आता माझ्या लक्षात आले, देशाचे प्रधानमंत्री भोपाळला गेले आणि तिथे त्यांनी एक भाषण केले. त्यात त्यांनी सांगितले, काँग्रेस हा पक्ष एक नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष आहे तर दोन नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आहे. राष्ट्रवादी हा भ्रष्ट असल्याची माहिती जर त्यांच्याकडे असेल आणि म्हणून जर त्यांनी कोल्हापूरात काही अॅक्शन घेतली असेल तर त्याबाबत मी काही बोलणार नाही. आणि असा भ्रष्टाचार जर कुणी केला असेल मग तो कुठल्याही पक्षाचा असो, राज्याचा, जिल्ह्याचा असो त्यांना धडा शिकवणे हे केंद्र सरकारचे, ईडी डिपार्टमेंटचं काम आहे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT