NCP-shard Pawar Group-Shivsena  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Political Crime : शिंदेसेना अन्‌ शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पंढरपुरात राडा; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षावर तलवारीने वार

Pandharpur NCP Vs Shivsena : वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे हे रविवारी रात्री लक्ष्मी टाकळी येथील आनंदनगर चौकातील चहाच्या दुकानात आले होते. त्या वेळी संशयित आरोपींनी मांडवे यांच्यावर हल्ला केला.

Vijaykumar Dudhale

Pandharpur, 19 August : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंढरपूर तालुका संदीप मांडवे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या दोन गटात पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे जोरदार हाणामारी झाली.

तलवार, लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्याने झालेल्या हाणामारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पंढरपूर (Pandharpur) तालुकाध्यक्ष संदीप मांडवे यांना उपचारासाठी पंढरपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हा प्रकार रविवारी (ता. 18 ऑगस्ट) रात्री उशिरा घडला.

या प्रकारामुळे लक्ष्मी टाकळी परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांचा बंदोबस्त या परिसरात वाढविण्यात आला आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात पिंटू उर्फ विवेक औदुंबर मांडवे यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय देविदास साठे, शिंदे शिवसेनेचे (Shinde Sena) सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश देविदास साठे, दयानंद देविदास साठे, आदित्य महेश साठे, समर्थ संजय साठे, राजू उकरंडे, सोमनाथ कोळी, औदुंबर ढोणे, कृष्णा साठे, गोटया नागटिळक (सर्व राहणार लक्ष्मी टाकळी) यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे हे रविवारी रात्री लक्ष्मी टाकळी येथील आनंदनगर चौकातील चहाच्या दुकानात आले होते. त्या वेळी संशयित आरोपींनी बेकायदा जमाव जमवून तलवारी, लोखंडी कोयता व लाकडी दांडक्यांनी संदीप मांडवे यांच्यावर हल्ला केला.

मांडवे यांच्या डोक्यावर तलवारीचे वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी आहेत. आरोपी दयानंद साठे याने फिर्यादीच्या डाव्या हातावर दांडके मारून जखमी केले. तसेच, मनोज घाडगे व धीरज देवकते यांनाही मारहाण करून जखमी केले आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वडणे हे तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT