Rohit Pawar Vs Devendra Fadnavis  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Pawar Vs Devendra Fadnavis : 'दिल्लीवरून आदेश आला, म्हणून फडणवीस घाबरलेत'; रोहित पवारांचा हल्लाबोल

Rahul Gadkar

Kolhapur News : आमदार रोहित पवार हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाबरले आहेत. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला घाबरलेत. दिल्लीवरून आदेश आला असावा. राज्यात भाजप विधानसभा निवडणुकीत 60 जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. यातूनच देवेंद्र फडणवीस वेगवेगळी वक्तव्य करत आहे", असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar) आमदार रोहित पवार म्हणाले, "महायुती एकत्र करून 115 जागांच्या पुढे जात नाही. आता पर्याय शिल्लक राहिला नाही. तुम्ही पूर्वीच्या स्टाईलने जावा, कुठेतरी हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा करा आणि त्यावर राजकीय पोळी भाजा, असा आदेश केंद्राकडून देवेंद्र फडणवीस यांना आला असेल. महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत".

'एखादा गुरु चांगल्या विचाराचा आणि विचारांशी लढणारा असेल महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल, तर अशा गुरूला गुरुदक्षिणा विचार करून आणि जपून द्यायला हवी. मात्र दुर्दैवाने मंत्री हसन मुश्रीफांनी ते विचार जपले नाहीत. मंत्री मुश्रीफांनी पुरोगामी विचार जपला नाही, विचार जपण लोकांसाठी काम करणं, हे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासह त्या नेत्यांना जमलं नाही. म्हणूनच ते स्वार्थासाठी महायुती सोबत गेलेत', असा हल्लाबोल रोहित पवार यांनी केला.

भ्रष्टाचारात सरकार निर्लज्ज झालय

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांपैकी 30 ते 40 टक्केच विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोचले आहेत. जे पोचले ते वेडेवाकडे शिवलेले गणवेश आहेत, या गणवेशांचा दर्जा खराब आहे. गणवेश वाटपात राज्य सरकारने गुजरातचं कापड घेतलं. कुठे शिवायला दिलं माहित नाही, इतर विभागांमध्ये जसा भ्रष्टाचार केला, तसाच गणवेश वाटपातही झाला. इतकं निर्लज्ज सरकार झाला आहे की, छत्रपती शिवरायांचा पुतळा आणि गणवेशातही पैसे खायला लागल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला.

सत्तेसाठी घाईगडबडीत चुकीचे निर्णय

राज्य सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत निर्णय घेत आहे. सरकारने वेगवेगळी समाजनिहाय मंडळे काढली होती. सरकारला वाटत होतं मुंबई महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील. यामुळेच असे निर्णय घेण्यात आले. विविध महापुरुषांच्या नावावर मंडळी काढलीत. मात्र सरकारने त्याला एक रुपयाचा निधीही दिला नाही. गोमातेचा निर्णयही सरकारने घेतला. मात्र गाईचं खरं संगोपन शेतकरी करतात. दुष्काळाच्या काळात पाणी, चारा नव्हता, त्यावेळी दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी काढायला हवी होती. मात्र पाच महिने एकही छावणी राज्य सरकारने काढली नाही. गोमाता अडचणीत असताना मदत केली नाही. मात्र आता सरकार अडचणीत असताना गोमाता आठवते हे हास्यास्पद आहे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT