Sangli News : राज्यातील महायुतीने विधानसभा निवडुकींच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. पण अर्थसंकल्प झाल्यानंतरही याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफी देता येणार नसल्याचे सांगताना, कर्जाची रक्कम भरा असे आदेशच दिले. यामुळे आता राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून महायुतीचा निवडणुकीपूर्ता हा जुमला होता का असा सवाल आता करताना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी महायुतीवर अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर टीकेची झोड उठवली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी देखील महायुतीवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या सरकारवर आता शेतकऱ्यांना पैसे भरा म्हणण्याची वेळ आल्याची टीका केलीय.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट दरिबडची जिल्हा परिषद गट शेतकरी संवाद व महिला बचत गट मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. यावेळी श्री जय हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था तिकोंडी याचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाबासाहेब मुळीक, बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता ताई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, अमोल डफळे, ऍड. चन्नाप्पा होर्तिकार, अण्णासाहेब गडदे, सिद्धूअण्णा शिरसाड, पिराप्पा माळी, सुभाष पाटील, उत्तम चव्हाण, विवेक कोकरे, अमोल कराडे, सुरेखा कोळेकर, आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. सरकारला स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी वेळ नाही. लाडकी बहीण योजनेला कात्री लावली आहे. निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. यामुळे शेतकऱ्यांनी बँकाचे कृषी कर्जाचे पैसे भरले नाहीत. पण आता खुद्द अर्थमंत्री अजितदादा यांना कर्जमाफी होऊ शकत नाही, पैसे भरा, सांगितले आहे. यामुळे हे सरकार राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केलीय.
आपले अपयश लपविण्यासाठीच सरकार औरंगजेबसह अनेक धार्मिक मुद्दे पुढे करत आहे. राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही टीका जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यात लोकसभेला आघाडीचा मोठा विजय झाला. पण विधानसभेला दारुण पराभव झाला. या निवडणुका कशा पध्दतीने झाल्या, याची सर्वांनाच कल्पना आहे. आता आम्ही विरोधात असलो तरी जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून आम्ही बाजूला गेलेलो नाही. पुन्हा आपणांला सर्वांना सोबत घेवून नव्या उमेदीने लढावे लागेल.
1961पासून या तालुक्याशी स्व. राजारामबापूंचा ऋणानुबंध जपण्याची संधी मिळाली. आत्ताच्या सत्ताधारी पक्षाने त्यावेळी या योजनेला पैसे आणि पाणीच नसल्याचे सांगितले होते. परंतु, आघाडीची सत्ता येताच, आपण उपलब्ध पाणी व वापरातील बदल करून जतच्या विस्तारीत योजनेसाठी सहा टीएमसी तर टेंभूसाठी आठ टीएमसी पाणी दिलं. त्यामुळे आता तुमच्या हक्काचे पाणी कुणीही हिरावून घेणार नाही. आता ही योजना गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू. शिवाय ही योजना सोलरवर चालणार असून, भविष्यात पाणीपट्टीतही बचत होणार आहे.
यावेळी माजी आ. विलाराव जगताप यांनी, राज्यात जातीजातीत भांडणे लावून सत्ता उपभोगण्याचा चुकीचा प्रकार सध्या सुरू आहे. विकासाच्या नावाने काहीच नाही, पण विनाकारण डोकी भडकविली जात आहेत. जयंतराव पाटील हे एकटेच सरकारशी दोन हात करत आहेत. या सरकारला जयंतराव तुम्ही नुसती "भुल देवू नका, त्यांची सर्जरी करा". जनतेच्या समोर सत्य आले पाहीजे. कालच्या विधानसभेला गोपीचंद पडळकरांनी 40 कोटींचा खर्च केला. यावेळी गोपीचंद आले, पुढच्यावेळी आणखी कुणीतरी ध्यानचंद येईल. पण जोवर तुम्ही भूमीपूत्राला न्याय देणार नाही, तोवर तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. बैठकांचा फार्स, मोठी स्वप्नं दाखवणं सोपं आहे, पण विकासाला निधी आणि लोकांचे प्रश्न किती सुटतात हे पाहणे गरजेचे आहे. आज विस्तारीत योजनेला 250 कोटींची गरज आहे, ते पैसे मिळत नाहीत, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.