Jayant Patil-Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी इचलकरंजी विधानसभेची जागा लढवणार : जयंत पाटलांची घोषणा

विधानसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा काळ आहे. लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्याशी संवाद साधा.

सरकारनामा ब्यूरो

इचलकरंजी : मागील २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) इचलकरंजी (Ichalkaranji) विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली नव्हती, त्यामुळे ज्यांनी निवडणूक लढवली, लोक त्यांच्याकडे वळले. पण, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघात निवडणूक लढवेल. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पक्षाचे येथे काम करावे. तशी पावले उचलत कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. (NCP will contest Ichalkaranji Assembly seat : Jayant Patil's announcement)

दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यता आली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसकडून राहुल खंजिरे यांनी निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने येथून आपल्या पक्षाचा उमेदवार विधानसभेसाठी उतरविला होता.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज इचलकरंजी येथे आली होती. त्या वेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला आणखी दोन वर्षांचा काळ आहे. लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्याशी संवाद साधा. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादीचे विचार रुजवा. प्रत्येक वॉर्डात जाऊन पक्षाचा विस्तार करा. आपला उत्साह प्रचंड मोठा आहे. या उत्साहाचे रुपांतर ऊर्जेत करा आणि पक्षाच्या मागे कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा उभा करा.

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना गती द्यायची असेल आणि जातीयवादी पक्षांना पराभूत करायचे असेल तर आपल्याला गटतट सोडून एकत्र काम करावे लागेल. शरद पवार यांच्या विचारांचा झेंडा हाती घेऊन केवळ घड्याळ डोक्यात ठेवून काम करा. इचलकरंजी येथील पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत एकत्र बसून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

हसन मुश्रीफ म्हणाले की, इचलकरंजी हे कामगारांचे शहर आहे. मागासवर्गीय समाज इथं मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत आहे. आपल्याला या सर्व घटकातील व्यक्तींना राष्ट्रवादीप्रती एक विश्वास निर्माण करून द्यायचा आहे आणि त्यासाठी बुथवर आपले कार्यकर्ते उभे केले पाहिजे.

यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजीव आवळे, मदन कारंडे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अनिल साळोखे, युवक शहराध्यक्ष अभिजीत रवंदे, इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश पाटील, महिला शहराध्यक्ष माधुरी चव्हाण उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT