Nagesh Fate
Nagesh Fate Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात उद्योग रथयात्रा काढणार!

भारत नागणे

पंढरपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात पहिला नंबर मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) कंबर कसली आहे. यामध्ये राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागानेही आघाडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शेती आणि इतर उद्योग व्यवसायासंबंधीची भूमिका तरुणांपर्यंत पोचवण्यासाठी उद्योग यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरुवात लवकरच पंढरपुरातून केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेस व्यापार उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी दिली. (NCP will hold industrial rath yatra in the state)

राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी राष्ट्रवादीने पक्षविस्तारावर आपले अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परिवार संवाद यात्रा काढली होती. यात्रेच्या निमित्ताने अंतर्गत मतभेद आणि हेवेदावे मिटवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. यानिमित्ताने गाव पातळीपासून महानगरापर्यंत पक्षवाढीचे प्रयत्न सुरु आहेत.

आता राष्ट्रवादी उद्योग व व्यापर विभागाने ही ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग व्यवसायसंबंधीची माहिती देण्यासाठी उद्योग यात्रा काढली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उपस्थितीत या विभागाची राज्यस्तरीय बैठक झाली. बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसला अधिक फायदा होण्याच्या दृष्टीने विचार मंथन करण्यात आले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी लवकरच उद्योग यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

फाटे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे. तरुणांचा कल ‘स्टार्टअप’ आणि उद्योग व्यापाराकडे आहे. वेगाने बदलणाऱ्या या जगात आपल्याला संघटनेतसुद्धा बदल जुळवून घ्यावे लागतील. राजकारणाचा परिघ औद्योगिक क्षेत्रातदेखील विस्तारला जात आहे. सर्वांना नोकरी शब्द नसल्याने उद्योग व व्यापार याकडे पुढील काळात लोकांचा जास्त भरणा असणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यांत आणि प्रत्येक उद्योगांत शरद पवारांना व त्यांच्या विचारांना मानणारी माणसे आहेत. त्यांची संघटनात्मक बांधणीची गरज आहे. हा विभाग अत्यंत मजबूत, सक्षम आणि सुधारणावादी बनवण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत. उद्योग व व्यापारात येणाऱ्या अडचणींचे निवारण करणे, व्यापाऱ्यांशी संवाद साधणे व त्यांचे प्रश्न सोडवणे, शेतीपूरक ‘स्टार्ट अप’ लोकांना सोबत घेणे, शेती मार्गदर्शन संवाद घडवणे व राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कार्यक्रम राबवणे हे आपले ध्येय असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्योग व व्यापार विभाग अधिक सक्षम करण्यासाठी उद्योग यात्रा काढणार असल्याचेही फाटे यांनी सांगितले.

या वेळी, प्रशांत जगताप, राहुल जगताप, बाळासाहेब देशमुख, केतन सदाफुले, दिनेश मोरे, नीलेश शहा, मनीषा भोसले, राजकुमार माने, कल्याण कुसुमडे, भोलासिंग अरोरा, संजय पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रल्हाद डिसले, राजकुमार गुगळे, प्रशांत देवरे, मुराद अडरेकर, धनराज खिराडे, प्रभाकर देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT