Solapur Politics:
Solapur Politics: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics: राष्ट्रवादीचे कल्याणराव काळे पुन्हा बाजी मारणार : 'सहकार शिरोमणी'ची निवडणूक बिनविरोध करणार?

भारत नागणे

Solapur Politics : सध्या विठ्ठल परिवाराच्या ताब्यात असलेली यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था, निशिगंधा सहकारी बॅंक या सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांना यश आले आहे. या यशा नंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांनी सहकारी साखर कारखान्याची निवडणुक ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधकांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर ही बरेच काही अवलंबून राहणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रियेला पुन्हा सुरवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेली यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था व निशिगंधा सहकारी बॅंक या दोन प्रमुख संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

या निवडणुकांच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील सर्व भागातील कार्यकर्त्यांना समान न्याय देवून त्यांनी राजकीय व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. दोन संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या नंतर आता सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिवंगत वसंतराव काळे यांनी या कारखान्याची उभारणी केली. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर 1995 साली प्रत्यक्षात कारखाना सुरु झाला. कारखाना सुरु झाल्यानंतर गेल्या 28 वर्षामध्ये अपवाद वगळता बहुतांश वेळा कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये डाॅ.बी.पी.रोंगे व कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी कारखान्याची निवडणुक लावली होती. यामध्ये त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.तरीही दिपक पवार यांनी काळे यांच्या विरोधातील भूमिका कायम ठेवत लढा सुरुच ठेवला आहे.

सध्या कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसामध्ये कारखान्याची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. यावर्षी त्यांनी सभासदांना चांगला ऊस दर जाहीर केल्यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वेळेत सर्व सभासदांच्या उसाचे गाळप करण्यात ही कारखाना प्रशासनाला यश आले आहे. तर दुसरीकडे काळे यांच्या विरोधातील दीपक पवार यांच्या मागे फारशी राजकीय ताकद नसल्याने त्यांचा विरोधाला मर्यादा आल्या आहेत.

कल्याणराव काळे यांचे माढा लोकसभा मतदार संघासह माढा, पंढरपूर, सांगोला,मोहोळ या चार विधानसभा मतदार संघात मोठी राजकीय ताकद आहे . त्यामुळे सर्वच पक्षातील नेते कल्याणराव काळे यांच्या कायम संपर्कात असतात. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणी मोठा नेता जाईल अशी सध्याची तरी परिस्थिती नाही. त्यामुळे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका त्यांच्या विरोधकांची देखील असल्याची खासगीत चर्चा सुरु आहे. काळे हे संयमी व शांत स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची मदत देखील होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या बहुतांश सभासदांनी देखील कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भूमिका घेतली आहे.

अभिजीत पाटील यांच्या भूमिकीकडे लक्ष

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील सहकार शिरोमणीच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकीकडे लक्ष लागले आहे. पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत ऐतिहासीक विजय मिळवल्यानंतर त्यांची तालुक्याच्या राजकारणातील महत्व ही वाढले आहे.

राजकीय महत्वाकांक्षा बाळगून असलेले अभिजीत पाटील यांनी सध्या विधानसभा मशीन सुरू केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी तशी तयारी ही सुरु केली आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दुरावलेल्या परिवारातील नेत्यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आगामी राजकीय नितीचा भाग म्हणून अभिजीत पाटील सहकार शिरोमणीच्या निवडणूकीपासून चार हात लांब राहतील अशी चर्चा सुरु आहे. केवळ विरोधाला विरोध करुन परिवारातील नेत्यांची व सभासदांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा निवडणूकी पासून दूर राहून बेरजेचे राजकारण केले तर ते भविष्याच फायद्याचे ठरु शकते असेही अभिजीत पाटील यांच्या थिंक टॅंकमधील काही जणांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT