Sangli, 02 March : सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सर्वाधिक १८ जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपकडून सर्व आयुधांचा वापर होताना दिसत आहे. त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येण्यासाठी ‘व्हीप’चा धाक दाखवला जात आहे. मात्र, सांगली राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत न जाण्यावर ठाम असून शनिवारी रात्री झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत भाजपला झेडपीच्या सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ‘बी प्लॅन’ तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राजेंद्र देशमुख, माजी आमदार अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शिवाजीराव नाईक, संजय पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेसंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भारतीय जनता पक्षाला पाठिंबा न देण्याबाबत एकमत झाले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जुळवून घेण्याचा निर्णयही या नेत्यांनी घेतल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा आदेश दिला तर सांगलीतील (Sangli) स्थानिक नेत्यांनी बी प्लॅन तयार ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन जिल्हा परिषद सदस्य हे पक्षाचा व्हीप झुगारून लावतील, त्यामुळे त्यांच्यावर पक्षाकडून अपात्रतेची कारवाई केली जाईल, त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्या सदस्यांना पुन्हा निवडून आणण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी ही जयंत पाटील, अजित घोरपडे आणि संजय पाटील यांच्यावर असणार आहे.
विशेष म्हणजे व्हीप झुगारणारे हे दोन सदस्य हे तासगाव, कवठे महांकाळ आणि आटपाडी भागातील असणार आहेत. त्यामुळे या भागातील माजी आमदार अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय पाटील यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची साथ असणार आहे, त्यामुळे भाजपला जोरदार धक्का देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिपबाबत दिलेल्या इशाऱ्यावर जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनीही स्पष्ट भूमिका घेतली आहे. मंत्री पाटील यांनी काहीही म्हटलेले असले तरी व्हीप हा आमच्याच पक्षाचा राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी शनिवारच्या बैठकीत मांडली आहे.
त्रास दिलेल्या नेत्याच्या पक्षाला पाठिंबा कसा द्यायचा? : घोरपडे
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अजितराव घोरपडे म्हणाले, राजकारणात कायम त्रास दिलेल्या तसेच निवडणुकीच्या काळात हैराण केलेल्या नेत्याचा पक्षाला कसा पाठिंबा द्यायचा, असे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांच्या या भावनांचा विचार करूनच पक्षाने हा निर्णय घेतला आहे. सांगलीत स्थानिक पातळीवर घेतलेल्या या निर्णयाची कल्पना आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देणार आहोत. पण सव्वा वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आमचा आग्रह कायम असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.